आज टायगर प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यादरम्यान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील सफारीचा आनंद घेतला. यादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय पीएम मोदी स्वतःच्या हाताने काही हत्तींना ऊस खाऊ घालताना दिसले. काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या या भेटीवर प्रश्न उपस्थित करत या फ्रकल्पाचे श्रेय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दिले.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका केली.'बांदीपूरमध्ये ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या टायगर प्रोजेक्टचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान घेतील. पर्यावरण, जंगल, वन्यजीव आणि वनक्षेत्रात राहणारे आदिवासी यांच्या रक्षणासाठी केलेले सर्व कायदे उद्ध्वस्त होत असताना ते खूप तमाशा करतील. ते कदाचित ठळक बातम्या मिळवू शकेल पण वास्तव याच्या अगदी उलट आहे, असं ट्विट त्यांनी केले आहे.
याशिवाय कर्नाटक काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा शाधला आहे. 'काँग्रेसने ७० वर्षांत काय केले? काँग्रेस सरकारनेच १९७३ मध्ये बांदीपूर व्याघ्र संवर्धन प्रकल्प राबवला, जिथे आज तुम्ही सफारीचा आनंद घेत आहात. त्याचाच परिणाम आहे की आज वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असं काँग्रेसने ट्विट केलं आहे. 'पीएम मोदींना विशेष आवाहन आहे की बांदीपूर अदानींना विकू नका, असा टोलाही यात लगावला आहे.
आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेचा अहवाल, व्याघ्र संवर्धनासाठी सरकारचा दृष्टीकोन यांचेही प्रकाशन करतील आणि या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ एक नाणेही जारी करतील. या निमित्ताने म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय मेगा इव्हेंटचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.