नवी दिल्ली - देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून बिपीन रावत यांची निवड केंद्र सरकारने केली आहे. मात्र बिपीन रावत यांच्या निवडीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वैचारिक जवळीकीमुळे बिपीन रावत यांची सीडीएसपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच सरकारने उचललेले हे पाऊल चुकीचे असल्याचे सांगत काँग्रेसने सीडीएसच्या कार्यक्षेत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, "अखेरीस बिपीन रावत हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनणार आहेत. केंद्र सरकारने निश्चितपणे त्यांची सर्वांगिन कामगिरी आणि वैचारिक जवळीकीचा विचार करून त्यांची नियुक्ती या पदावर केली आहे. भारतीय लष्कर ही एक अराजकीय संस्था आहे. त्या संस्थेबाबत सर्व भारतीयांना अभिमान आहे.'' बिपीन रावत यांच्या वैचारिक जवळीचा प्रभाव अराजकीय संस्था असलेल्या लष्करावर पडता कामा नये, असेही चौधरी यांनी आपल्या अन्य एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
बिपीन रावत यांच्या सीडीएसपदी झालेल्या नियुक्तीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 7:50 PM