नवी दिल्ली - फेसबूक डेटा लीक प्रकरणावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानचा आता काँग्रेसने मोदींच्या नमो अॅपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एनसीसीने आपल्या कॅडेट्सना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत अॅप डाऊनलोड करण्याच्या दिलेल्या आदेशांवरून या वादाला तोंड फुटले आहे. एनसीसीने कॅडेट्सचे मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी अशी माहिती गोळा केली असून, आता सरकारकडून या माहितीचा उपयोग राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहेत. काँग्रेसच्या नेत्या रम्या यांनी ट्विट करून नमो अॅप डिलीट करण्याचे आवाहन जनतेला केला आहे. काही महिन्यांपूर्वी एनसीसीने शाळा आणि महाविद्यालयांना पत्र लिहून त्यांच्या विद्यालयांमधील एसीसी कॅडेट्सना नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्याची, तसेच पंतप्रधान स्वत: कॅडेट्सशी संवाद साधू इच्छित असल्याने त्यांचे मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. एकीकडे फेसबूक डेटा लीक आणि केंब्रिज अॅनॅलिटिकावर फेसबूक डेटाचा वापर अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारतातील काही निवडणुकांमध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी झाल्याचा आरोप होत असतानाच एनसीसीने दिलेले या आदेशांमुळे देशातील राजकीय वातावरण तापू शकते. एनसीसीने शाळा आणि महाविद्यालयांना दिलेल्या सूचनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी हे मार्च महिन्यात नमो अॅपच्या माध्यमातून एससीसीच्या कॅडेट्ससोबत संवाद साधणार असल्याचे म्हटले होते. मात्र पंतप्रधान नेमक्या कोणत्या दिवशी कॅडेट्सशी संवाद साधणार याचा उल्लेख मात्र या पत्रात नव्हता.
काँग्रेसने उपस्थित केले नमो अॅपवर प्रश्नचिन्ह, एनसीसीच्या कॅडेट्सची माहिती गोळा केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 2:24 PM