नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटात डळमळीत झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतत सरकारी उपक्रमांत (PSUs) आपली भागीदारी विकण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यानुसार २७ जुलै २०२० रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. केंद्र सरकारने २३ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नलही मिळाला आहे, असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. सीतारमण यांनी खासगीकरण करण्यात येणाऱ्या २३ सरकारी कंपन्या कोणत्या आहेत, याबाबत काहीच सांगितले नव्हते. मात्र, सरकार आपली भागीदारी २३ नव्हे तर २६ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील विकत असल्याचे माहिती अधिकाराखालील (आरटीआय) विचारणेत उघड झाले आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोमवारी (7 सप्टेंबर) याबाबत एक ट्विट केलं आहे. '७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार' असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे. "देशाच्या आणखी २६ सरकारी कंपन्या विकल्या जाणार आहे. ७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार. मोदीजी काय सांगून सत्तेत आले होते ‘मैं देश नही बिकने दूँगा’ त्याचा अर्थ होता देशातील काही विक्री होण्यापासून सोडणार नाही. मोदी है तो यही मुमकिन है" असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
आरटीआय अर्जात या कंपन्यांची नावेही विचारण्यात आली होती. त्यानुसार सर्व २६ कंपन्यांच्या नावांसह, विकल्या गेलेल्या भागीदारीची टक्केवारी बाजारपेठेनुसार निश्चित केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय, आरटीआयमध्ये युको बँकेच्या खासगीकरणाच्या यादीत समावेश करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारने सर्व सेक्टर्स खाजगी क्षेत्रासाठी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, विविध क्षेत्रांच्या खासगीकरणाच्या धोरणाबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असे गेल्या काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या
चांद्रयान-3 मोहिमेत होणार मोठा बदल, जाणून घ्या कधी होणार लाँच?
जिद्दीला सलाम! शिक्षणासाठी गर्भवतीने स्कूटरवरून केला 1200 किमीचा खडतर प्रवास अन्...
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! "2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट"