लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत कुठल्याही राज्यात युती करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. यावर उत्तर प्रदेशातील काँग्रेस प्रवक्ते राजीव बख्शी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मायावतींची गरज नसल्याचे म्हटले आहे.
महाआघाडी होण्यासंदर्भातील निर्णय हा मायावती यांच्या हातात नव्हता. संसदेत त्यांचा एकही खासदार नाही आहे. त्यामुळे काँग्रेससोबत येणाचा किंवा न येण्याचा त्या निर्णय घेऊ शकत नाहीत. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू शकते. यासाठी कोणत्याही आघाडीची गरज नाही. तसेच, आम्हाला त्यांची (मायावती) गरज नाही, असे राजीव बख्शी यांनी सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत कुठल्याही राज्यात युती करणार नाही, असे मायावती मंगळवारी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, 'उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत सहमती युती केली. ही युती उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करण्यासाठी पुरेशी आहे. बसपासोबत युती करण्यासाठी अनेक पक्ष इच्छुक आहेत. पण, आता बसपा कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही. कारण निवडणुकीपूरता होणारी ही युती पक्षासाठी धोकादायक ठरू शकते.'