नरेंद्र मोदींना घेरण्याची काँग्रेसची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 06:02 AM2019-02-27T06:02:50+5:302019-02-27T06:03:07+5:30

गुजरातेत कॉँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक : प्रियंका गांधी यांच्या होणार जाहीर सभा

Congress ready to surround Narendra Modi | नरेंद्र मोदींना घेरण्याची काँग्रेसची तयारी

नरेंद्र मोदींना घेरण्याची काँग्रेसची तयारी

Next

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांना अमेठी-रायबरेलीत घेरण्याची तयारी चालविली असतानाच कॉँग्रेसनेही मोदी यांचा गड असलेल्या गुजरातमध्ये आव्हान देण्याची रणनीती आखली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी २८ फेबु्रवारीला अखिल भारतीय कॉँग्र्रेसच्या कार्यकारिणीची बैठक तब्बल ५८ वर्षांनंतर गुजरातमध्ये घेण्याची तयारी सुरू झाली आहे.


महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीतून मोदीविरोधी देशभर संदेश पोहोचविण्याचा निर्धार कॉँग्रेसने केला आहे. लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने किमान निम्म्या म्हणजे १३ जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने जबरदस्त प्रदर्शन करत भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही घाम फोडला आहे. त्यामुळेच भाजपानेही मोदी यांच्या बालेकिल्ल्यात कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता भाजपाने कॉँग्रेसला घेरण्याची तयारी सुरू ्रअसतानाच कॉँग्रेसनेही मोदी यांना त्यांच्या घरातच जबरदस्त आव्हान देण्याची रणनीती आखली आहे.


त्यासाठीच अखिल भारतीय कॉँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलाविण्याची तयारी चालविली आहे. या बैठकीला कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांची उपस्थित राहणार असून, त्यानंतर गांधी परिवाराच्या गुजरातमध्ये जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे.


कॉँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात ११ फेब्रुवारीला रोड शो केला होता. त्यानंतर स्वत: प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात तीन दिवस ठाण मांडत नागरिकांशी तळागाळात जाऊन संवाद साधत लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला होता. प्रियंका गांधी अस्त्राने भेदरलेल्या भाजपाने त्यानंतर कॉँग्रेसला अधिकच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. तर कॉँग्रेसनेही मागे न राहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गडावर आव्हान देण्याची जोरदार तयारी चालविली आहे. त्यासाठी कॉँग्रेसने आपली पूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आणि चंपारण्य सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होत असतानाच गांधी-पटेल यांच्या गुजरातमधून देशभरात मोदीविरोधी संदेश व नारा घेण्याचे आव्हान कॉँग्रेसने स्वीकारले आहे.

कॉँग्रेसचे मिशन-१३
कॉँग्रेसने भाजपाला गुजरातमध्ये पूर्णपणे घेरण्याची तयारी सुरू करीत यंदा लोकसभेच्या तेरा जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्वच्या सर्व २६ जागा जिंकून कॉँग्रेसला भुईसपाट केले होते. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर कॉँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे.
प्रामुख्याने आनंद, अमरेली, बनासकांठा, साबरकांठा, पाटण, जुनागढ, दाहोद, बारडोली, सुरेंद्र नगर, जामनगर, पोरबंदर, भरुच आणि मेहसाना या जागांकडे कॉँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसन मिशन १३ आखले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस सचिवांची नियुक्ती करीत त्यांना बूथस्तरावर कार्यकर्त्यांना संघटित प्रशिक्षित करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

५८ वर्षांनंतर बैठक
गुजरातमध्ये यापूर्वी अखिल भारतीय कॉँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठका १९०२, १९२१ आणि १९६१ मध्ये झाल्या होत्या. तब्बल ५८ वर्षांनंतर पुन्हा एकदा गुजरातमध्ये वर्कींग कमिटीची बैठक होणार आहे. राहुल गांधी यांनी कॉँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ही
चौथी बैठक आहे. यापूर्वी वर्धा
येथे अ.भा. कॉँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक झाली होती.

Web Title: Congress ready to surround Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.