सचिन पायलट यांच्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेणार, राजस्थानमधील सरकार वाचवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 10:01 AM2020-07-13T10:01:59+5:302020-07-13T12:33:34+5:30
सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे.
जयपूर/ नवी दिल्ली - राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. दरम्यान, सचिन पायलट यांची मनधरणी करण्याऐवजी काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. तसेच काही वेळाने होणाऱ्या बैठकीसाठी आमदारांना व्हिप बजावण्यात आला आहे.
जर काँग्रेसचा कुणीही आमदार या बैठकीला अनुपस्थित राहिला तर त्याचे सदस्यत्व रद्द होईल, असे बैठकीसाठी जारी करण्यात आलेल्या व्हिपमध्ये पक्षाने म्हटले आहे. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस अविनाश पांडे यांनी सांगितले की, ‘१०९ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे पोहोचले आहे. हे आमदारा सोमवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील. तसेच जे सदस्य या बैठकीला येणार नाहीत. त्यांचे सदस्यत्व रद्द होईल.’
तर रणदीप सुरजेवाला याबाबत म्हणाले की,’ आम्ही कुठल्याही व्यक्तीची गोष्ट करत नाही आहोत. तसेच या बैठकीला कुणी अनुपस्थित राहील, असे वाटत नाही,’ अविनाश पांडे आणि सचिन पायलट यांनी कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख सचिन पायलट यांच्या दिशेने होता हे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी जयपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी रात्री उशिरा पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये अविनाश पांडे, रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अविनाश पांडे म्हणाले की, कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार आम्ही जयपूरमध्ये आलो आहोत. १०९ आमदारांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिली आहे. तसेच अन्य काही आमदारसुद्धा आमच्या संपर्कात आहेत. सकाळी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक आहे. त्या बैठकीसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. जो या बैठकीस अनुपस्थितीत राहील, त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच व्हीपचे उल्लंघन केल्यास त्या सदस्याचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात येईल.