Congress CWC Meeting:काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच हैदराबाद येथे पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते, मंत्री, पदाधिकारी उपस्थित होते. आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली गेली. अगदी सनातन धर्माच्या वादाबाबत दूर राहण्यापासून ते भाजपला पराभूत करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसच्या विस्तारित कार्यसमितीच्या बैठकीत तेलंगणासह पाच राज्यांच्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणनीती, संघटना मजबूत करणे आणि अन्य काही विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीस संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस नेत्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. तसेच देशात परिवर्तनाची चिन्हे दिसत असून, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल याचा पुरावा असल्याचे सांगितले. ही वेळ आरामात बसण्याची नाही. दिवस-रात्र मेहनत करावी लागेल. शिस्तीशिवाय कोणीही नेता होत नाही, असे सांगत खरगे यांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ यावरून केंद्र सरकारवर टीका केली.
१४ कलमी ठराव मंजूर करण्यात आला
काँग्रेस कार्यकारी समितीच्या अनेक तासांच्या बैठकीनंतर १४ कलमी ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची स्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या, चीनसोबतचा सीमावाद, अदानी समूहाशी संबंधित गैरव्यवहार आदी अनेक समस्यांचा उल्लेख करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखिवदर सिंग सुखू रविवारी झालेल्या विस्तारित कामकाजाच्या बैठकीत सहभागी झाले होते.
दरम्यान, या बैठकीत राहुल गांधींसह अन्य नेत्यांनी सनातन धर्माबाबत सुरू असलेल्या वादापासून काँग्रेसने दूर राहायला हवे, असे मत व्यक्त केले. पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याच्या सापळ्यात फसू नये. त्या वादात अडकण्याच्या फंदात पडू नये. काँग्रेस नेत्यांनी जनतेचे हित जपणाऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे राहुल गांधींनी स्पष्ट शब्दांत सांगितले.