लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाला महाविकास आघाडीत स्थान देण्याविषयी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. या विषयावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निर्णय घ्यायचा आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या ४९, लोधी इस्टेट या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीचे सदस्य अशोक गहलोत, भूपेश बघेल, मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे रमेश चेन्नीथला यांच्याशी राज्यातील काँग्रेसच्या सहा बड्या नेत्यांची महाविकास आघाडी तसेच जागावाटपाविषयी धोरणात्मक चर्चा झाली. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण तसेच मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड हे नेते आले होते.
दीड तास चाललेल्या या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाचे सूत्र कसे असेल, यावर चर्चा झाली. या बैठकीत कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. मुंबईत महाविकास आघाडीसोबत राज्यातील काँग्रेसची चर्चा होईल, असेही ते म्हणाले.
वंचितचा प्रश्न ठाकरेंमुळे सुटेल
ठाकरे गटाने लोकसभेच्या ४८ पैकी २३ जागांवर दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांची वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याने शिवसेनेने आपल्या कोट्यातून वंचितसाठी जागा सोडल्यास जागावाटपाचा प्रश्न सुटू शकतो, असे या बैठकीत सहभागी झालेल्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. वंचितशिवाय स्वराज्य आणि स्वाभिमानी पक्षाला मविआमध्ये सामावून घेण्याविषयीही बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती आजच्या बैठकीचा अहवाल खरगे आणि राहुल गांधी यांच्यापुढे मांडणार असून, त्यानंतरच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसश्रेष्ठींची जागावाटपाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.