प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार; भाजपने राजकीय रंग दिल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 06:03 AM2024-01-11T06:03:32+5:302024-01-11T06:04:06+5:30
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याचाही केला दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी आदरपूर्वक नाकारले आहे. या सोहळ्याला भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय रंग दिल्याचा आरोपही काँग्रेसने बुधवारी केला.
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. तरीही प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यामागे भाजप, संघाचा नेमका हेतू काय आहे, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विचारला. धर्म ही खासगी बाब आहे. रामजन्मभूमी - बाबरी मशीद खटल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा,लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, मात्र मंदिराचा मुद्दा भाजप, संघ राजकीय फायद्यासाठी वापरत आहेत, असे ते म्हणाले.