चीन मुद्यावरून काँग्रेस जाब विचारणार, सीमांचे रक्षण करण्यात अपयश आल्याचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 02:59 AM2018-01-19T02:59:55+5:302018-01-19T03:00:27+5:30
चीनच्या मुद्यावरून सरकार आणि काँग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सगळ्या प्रश्नांना उपस्थित करू
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : चीनच्या मुद्यावरून सरकार आणि काँग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सगळ्या प्रश्नांना उपस्थित करू. त्यात चीनचाही मुद्दा असेल, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत.
पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला, की मोदी सरकार देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या आरोपाला उत्तर देताना काँग्रेस पक्ष लष्कराच्या मुद्यावर जे राजकारण करीत आहे त्यात देशहित नाही, असे म्हटले. काँग्रेसचा आरोप होता, की चीनने डोकलाम पठारावर कब्जा केला आहे व त्यामुळे उत्तरपूर्वेसाठी धोका निर्माण झाला आहे. उपग्रहाने जी छायाचित्रे पाठवली आहेत त्यातून हे स्पष्ट दिसते, की देशाच्या सीमांवर संकट उभे ठाकले आहे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज वस्तुस्थितीला तोंड न देता देशाची दिशाभूल करीत आहेत.
उपग्रहाने जी छायाचित्रे पाठवली व प्रसारमाध्यमातून जे येत आहे त्यातून चीनने डोकलाम पठारावर कब्जा केल्याचे दिसते. चीनने त्या पठारावर हेलिपॅडही तयार केले आहे व त्याच्या कारवाया (बंकर बनवणे, वाहनांची ये-जा) वेगाने सुरू आहेत, असे काँग्रेसने म्हटले.
भारतीय लष्करापासून काहीच मीटर अंतरावर चीनने बनवलेला निरीक्षण मनोरा हेच सांगतो, की चीनचे सैन्य आमच्या सैन्यावर लक्ष ठेवून आहे. अशा अनेक गोष्टी आहेत व त्याची सगळी माहिती सरकारकडे आहे; परंतु सरकार ती लपवत आहे. देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे, असे काँग्रेसला वाटते. सामरिक हितासाठी चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवली जावी व मुत्सद्देगिरीतून प्रश्न सोडवले जावेत; परंतु सरकार अशी काहीही उपाययोजना करीत नाही, असे सुरजेवाला म्हणाले.