नवी दिल्ली : संपुआ सरकारच्या काळात २०१२मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांनी निवृत्तीच्या वयावरून सरकारशी संघर्ष पुकारला होता. त्यानंतर लष्कराच्या तुकड्यांनी दिल्लीकडे आगेकूच करीत बंडाच्या हालचाली चालविल्या होता, असा दावा माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केला आहे. त्यावरून रविवारी दिल्लीतील राजकारण तापले. तिवारी यांनी हा मुद्दा उपस्थित करीत जणू त्या काळी सत्तेवर असलेल्या संपुआ सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण काँग्रेसनेच हा दावा खोडून काढल्याने तिवारी एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले. तरीही जदयूने व्ही.के. सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर भाजपाने संपुआ सरकारचे नेतृत्व केलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवेदनाची मागणी केली. स्वत: व्ही.के. सिंग यांनी ‘बकवास’ या एका विशेषणाने तिवारींच्या आरोपाची संभावना केली. त्या वेळी सैन्याने आगेकूच केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते ते दुर्दैवी असले तरी सत्य होते, असे तिवारींनी म्हटले आहे. काँग्रेसने तिवारींच्या या दाव्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले; शिवाय तिवारींचा दावा खोटा असल्याचे सांगताना तत्कालीन लष्करप्रमुख विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी म्हटले, तिवारी यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, त्यामुळे त्यांनी हे तद्दन ‘बकवास’ विधान केले आहे.तिवारींनी हे विधान करण्यासाठी हीच वेळ का निवडली, असा प्रश्न उपस्थित करीत भाजपाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवेदनाची मागणी केली आहे. तिवारी हे आॅक्टोबर २०१२ ते मे २०१४ या काळात माहिती आणि प्रसारण मंत्री राहिले होते.मी त्या वेळी संरक्षणासंबंधी स्थायी समितीचा सदस्य होतो. लष्कराने आगेकूच केल्याचे वृत्त दुर्दैवी मात्र सत्य होते. मला या वादात पडायचे नाही, मात्र ते वृत्त खरे होते, असे तिवारी यांनी शनिवारी एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी म्हटले. एका इंग्रजी दैनिकाने ४ एप्रिल २०१२ रोजी हे वृत्त प्रसिद्ध केले होते. सरकारला कोणतीही माहिती न देता लष्कराच्या दोन तुकड्यांनी दिल्लीकडे आगेकूच केल्याचे त्यात म्हटले होते. तिवारी यांनी या मुद्द्यावर पुस्तकात लिहिले असून, ते वाचले जावे अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे, स्वत:चे पुस्तक सर्वांनी वाचावे, असे त्यांना सुचवायचे असावे, असे व्ही.के. सिंग यांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)वृत्तात काय म्हटले होते....१६ जानेवारी २०१२ रोजी हरियाणातील हिस्सार येथून लष्कराच्या इन्फन्ट्रीमधील एका तुकडीने सरकारला कोणतीही माहिती न देता अनपेक्षितपणे दिल्लीकडे कूच केले होते.त्याच रात्री आग्रा येथील ५०व्या निमलष्करी दलाच्या एका तुकडीनेही दिल्लीकडे प्रस्थान केले होते, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने दिले होते.
लष्कराच्या ‘चलो दिल्ली’चा काँग्रेसकडून इन्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2016 3:16 AM