नवी दिल्ली - २००२ च्या जातीय दंग्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार पाडण्याचे मोठे कारस्थान रचले होते. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या इशाऱ्यावरून रचण्यात आलेल्या कारस्थानात सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व इतर काही लोक सामील होते, असा दावा गुजरात पोलिसांच्या एसआयटीने अहमदाबादच्या सत्र न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. अहमद पटेल हे काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. पटेल यांच्याकडून तिस्ता सेटलवाड यांनी ३० लाख रुपये घेतले होते, असेही एसआयटीने म्हटले आहे. या दाव्यावरून भाजप व काँग्रेसने परस्परांवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसकडून अहमद पटेल यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. "मोदी राजकीय सूड घेण्यासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही सोडत नाही" असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक पत्रक ट्वीट केले आहे. या पत्रात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. तसेच गुजरातमध्ये झालेल्या दंगलीची जबाबदारी झटकण्यासाठी हे आरोप लावण्यात आले असल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. यासोबतच पंतप्रधान राजकीय सूड घेण्यासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तींना सोडत नाही अशी जोरदार टीकाही त्यांनी मोदींवर केली आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यावर गुजरात सरकारच्या एसआयटीने केलेले आरोप म्हणजे २००२ च्या जातीय दंगलीच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या रणनीतीचा भाग आहे, असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातच्या दंगली रोखण्याची इच्छा व क्षमता नव्हती. त्यामुळेच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी यांनी मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली. गुजरातच्या एसआयटीने केलेले खोडसाळ आरोप काँग्रेस फेटाळून लावत असल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.