गांधी कुटुंबीयांचा दबदबा संपुष्टात आणणारा होता प्रशांत किशोर यांचा फॉर्म्युला! नेमकं कुठं फिस्कटलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:55 AM2022-04-27T11:55:07+5:302022-04-27T11:56:14+5:30
Prashant Kishor congress: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
नवी दिल्ली
Prashant Kishor congress: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्वत: प्रशांत किशोर यांनी ट्विट करून त्यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याची ऑफर नाकारली आहे. खरंतर प्रशांत किशोर यांच्या कामाची पद्धत आणि काँग्रेसची कार्यशैलीची माहिती असणाऱ्यांना या घडामोडीचं फार काही विशेष वाटणार नाही. पण प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यातील चर्चा नेमकी कुठं फिस्कटली याची माहिती आता समोर आली आहे.
काँग्रेसमध्ये सक्रीयपणे काम करत पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी मांडलेला फॉर्म्युला स्वीकारणं काँग्रेसला खूप कठीण होतं. कारण प्रशांत किशोर यांना रणनितीची सुत्रं देणं म्हणजे काँग्रेस आणि गांधी घराण्याच्या भवितव्यासाठी मोठी जोखीम पत्करण्यासारखे होते. ज्यासाठी ना गांधी घराणे तयार होतं, ना पक्षाच्या दुसऱ्या फळीतील दिग्गज नेते.
"मी काँग्रेसच्या एम्पावर्ड ग्रूप २०२४ चा सदस्य होण्यासाठीचा, पक्षात सामील होण्याचा आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. माझ्या मते, पक्षातील अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसला माझ्यापेक्षा कणखर नेतृत्व आणि प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे", असं प्रशांत किशोर यांनी ट्विट करत काँग्रेससोबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचं सांगितलं.
दुसरीकडे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी देखील ट्विट करत काँग्रेस अध्यक्षांनी एक एम्पावर्ड ग्रूप 2024 तयार केला आणि प्रशांत किशोर यांना गटात सामील होण्याचे आमंत्रण दिले, परंतु त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे आणि पक्षाला दिलेल्या सूचनांचे आम्ही कौतुक करतो, असं म्हटलं आहे.
प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कॉंग्रेसमध्ये बरीच सुधारणा करण्याची गरज असल्याचं त्यांनी सुचवलं आहे. त्यासाठी ते स्वत:ला देखील यासाठी कमी मानत आहेत. पक्षातील नेतृत्वाव्यतिरिक्त इतरही बर्याच कमतरता आहेत की ज्या ठीक करण्याची गरज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली आहे. तसंच काँग्रेस देखील प्रशांत किशोर यांना पक्षात सामील करुन घेण्यासाठी पूर्णपणे तयार होती. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या एम्पावर्ड ग्रूपचा सदस्य बनवून पक्षात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण प्रशांत किशोर यांनी पक्षात बदल करण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर काँग्रेस पक्षानं तयारी दाखवलेली नाही. यामुळेच चर्चा फिस्कटली आहे.
गेल्या वर्षीही प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या होत्या. मात्र त्यानंतरही त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग निघू शकला नाही. 2022 मध्ये पाच राज्यांच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर पुन्हा एकदा प्रशांत किशोर स्वतः काँग्रेसकडे आले आणि त्यांनी काँग्रेस अध्यक्षांसह अनेक बड्या नेत्यांसमोर प्रेझेंटेशन सादर केलं. यावेळी प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानला जात होता. पण तसं होऊ शकलेलं नाही. त्यामागे प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये हवी असलेली भूमिका आणि पक्ष बदलाचा फॉर्म्युला ठेवला होता, याला पक्षात संमती नव्हती.
प्रशांत किशोर यांना हवा होता 'फ्री हँड'!
काँग्रेसला प्रशांत किशोर यांच्या सूत्राचा, धोरणात्मक कौशल्याचा आणि निवडणूक व्यवस्थापनाचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे, पण प्रशांत किशोर यांना त्यांची कृती योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेले स्वातंत्र्य काँग्रेस त्यांना देऊ इच्छित नाही. असं मानलं जातं की प्रशांत किशोर यांनी पक्षात सामील व्हावे आणि इतर नेत्यांप्रमाणे मर्यादित भूमिका तसंच मर्यादित अधिकारांसह काम करावं असं काँग्रेसचं म्हणणं होतं. तर प्रशांत आपल्या कामात कोणताही हस्तक्षेप किंवा बदल स्वीकारण्याच्या बाबतीत एक इंचही मागे हटायला तयार नव्हते. प्रशांत किशोर यांनी पक्षात प्रवेश घेतल्यास त्यांना विशेष अधिकार मिळतील, हे काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वानं स्पष्टपणे नाकारल्याचं बोललं जात आहे.
गांधी कुटुंबाच्या बाहेरचं नेतृ्त्व
काँग्रेसचं राजकारण गांधी घराण्याभोवतीच फिरत आलं आहे. प्रशांत किशोर यांच्या योजनेनुसार काँग्रेसची कमान गांधी कुटुंबाबाहेरील सदस्याकडे सोपवली जाणार होती. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला हे मान्य नव्हतं, कारण 2019 पासून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप होऊ शकलेली नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर सोनिया गांधी या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा आहेत. यूपीए अध्यक्षपदासाठीही प्रशांत किशोर यांनी कोणत्याही मित्रपक्षाचा नेता देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, तो काँग्रेसला मान्य नव्हता. काँग्रेस नेते नेहमी विरोधी आघाडीची चर्चा करतात, पण नेतृत्व देण्यास ते मान्य करत नाहीत.
काँग्रेसमध्ये गांधी घराण्याची विश्वासार्हता जपण्याचाही प्रश्न आहे. प्रशांत किशोर यांच्या प्रवेशानंतर पक्षात जे काही निर्णय झाले, त्याचे श्रेय गांधी घराण्याऐवजी प्रशांत किशोर यांना गेले असते. अशा परिस्थितीत गांधी घराण्याच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का बसेल, कारण काँग्रेसमध्ये हायकमांडची संस्कृती आहे. इथे गांधी घराण्याशी असलेली निष्ठा हीच काँग्रेसची खरी निष्ठा मानली जाते. प्रशांत किशोर यांनी पक्षात प्रवेश केल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम गांधी कुटुंबावर होण्याची शक्यता होती, त्यामुळे पक्षात सूचना करण्याचा अधिकार प्रशांत किशोर यांना देण्याच्या बाजूने ते दिसत होते.