राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले; सोनिया गांधी, खर्गे अनुपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 04:42 PM2024-01-10T16:42:20+5:302024-01-10T17:14:02+5:30
Ram Mandir: २२ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही.
नवी दिल्ली: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले आहे. पक्षातर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही.
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश आज एक पत्रक काढत म्हणाले की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि नेते अधीर रंजन चौधरी यांना २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते. प्रभू रामाची आपल्या देशात लाखो लोक पूजा करतात. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. पण राम मंदिराचे उद्घाटन भाजपा आणि आरएसएसच्या नेत्यांनी निवडणुकीच्या फायद्यासाठी पुढे आणले आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या २०१९ च्या निकालाचे पालन करताना आणि प्रभू रामाला पूजणाऱ्या लाखो लोकांच्या भावनांचा आदर करताना, मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्टपणे आरएसएस आणि भाजपा कार्यक्रमाचे निमंत्रण आदरपूर्वक नाकारले आहे, असं जयराम रमेश यांनी पत्रकात म्हटलेलं आहे.
Here is the statement of Shri @Jairam_Ramesh, General Secretary (Communications), Indian National Congress. pic.twitter.com/JcKIEk3afy
— Congress (@INCIndia) January 10, 2024
दरम्यान,अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिर उभारणीचा देशभरात उत्साह असून भाविकांचे डोळे अयोध्येकडे लागले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ७ लाख भाविक अयोध्येत दाखल होणार आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, सेलिब्रिटीही सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. तर, संत, महात्मा आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी संघर्ष करणारे कारसेवकही या सोहळ्यासाठी अयोध्येत येत आहेत.