१२८ देशांच्या राजकीय पक्षांशी काँग्रेसचे संबंध -आनंद शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 05:48 AM2020-06-20T05:48:11+5:302020-06-20T05:49:09+5:30
काँग्रेसचा पलटवार; भाजपचे असे संबंध नाहीत का?
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेस आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीदरम्यानच्या समझोत्यावरून केल्या जात असलेल्या हल्ल्यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला. काँग्रेसचे १२८ देशांच्या राजकीय पक्षांसोबत संबंध आहे. भाजपचे दुसऱ्या देशांतील राजकीय पक्षांशी संबंध नाहीत का? हे भाजपने आधी स्पष्ट करावे. भाजप ढोंग करीत असून, भाजपचा हा दुटप्पीपणा आहे, असे म्हणत काँग्रेसच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रभारी आनंद शर्मा यांनी भाजपवर निशाणा साधला.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस जगातील राजकीय पक्षांसोबत पक्षस्तरीय संबंध प्रस्थापित करीत आहे. काँग्रेसचे आज जगातील १२८ देशांतील राजकीय पक्षांसोबत संबंध असून, सर्व मुद्यांवर पक्षपातळीवर विचारविनिमय केला जातो, असे सांगत आनंद शर्मा यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली.
२०१५ मध्ये भाजपच्या एका सहयोगी संघटनेने चीनमध्ये समझोता करार स्वाक्षरित केला नव्हता का? राम माधव यांनी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून चीनचे किती दौरे केले? आॅगस्ट २०१९ मध्ये भाजपचे ११ सदस्यांचे एक शिष्टमंडळ चीन दौºयावर असताना भाजपने चीनच्या कम्युनिस्ट पार्टीसोबत पक्षस्तरीय संबंध प्रस्थापित करण्याचे साकडे घातले नव्हते का? अशा प्रश्नांचा भडिमार करीत आनंद शर्मा यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.
सप्टेंबर २०१९ मध्ये भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखाली चीन दौºयावर गेलेल्या शिष्टमंडळात विजय चौथाईवाले यांचा समावेश होता.
या शिष्टमंडळाचा उद्देश पक्षस्तरीय संबंध स्थापन करण्याचा नव्हता का? चौथाईवाले यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस साँग ताओ यांना सुपूर्द केलेल्या अमित शहा यांच्या पत्रात काय लिहिले होते? हे भाजपने जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी केले.
काँग्रेसने आज जगातील १२८ देशांतील राजकीय पक्षांशी संबंध असून, पक्षपातळीवर सर्व मुद्यांवर चर्चाही केली जाते. आफ्रिकेतील ४३ राजकीय पक्षांसोबत संबंधासोबत सहमती करारही आहे, असेही आनंद शर्मा यांनी स्पष्ट केले.
राजकीय पक्षपातळीवर संबंधाची सुरुवात नेहरूंच्या काळात झाली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी ही परंपरा चालू ठेवली. नेपाळी काँग्रेस, तत्कालीन सोव्हिएत संघातील कम्युनिस्ट पार्टीसोबत समझोता करार आहे. आजही ब्रिटनच्या मजूर पक्षासोबत सहमतीच्या आधारवर काँग्रेसचे संबंध आहेत. जर्मनी, रशियासह जगातील १२८ देशांत काँग्रेसचे सहमतीच्या आधारावर राजकीय पक्षांशी संबंध असून, ते आजही कायम आहेत.
यात नावीन्य काही नाही
राजकीय पक्षांचे दुसºया देशांशी संबंध असण्यात काहीही नावीन्य नाही. काँग्रेसच्या अधिवेशनात विदेशी मित्र देशांचे प्रतिनिधीही सहभागी होत असतात. काँग्रेसने कोणत्या नेत्याने केव्हा आणि कोणत्या देशांसोबत पक्षस्तरीय समझोता करार केले, हे नीटसे आठवत नाही. तथापि, असे करार फक्त पक्षांसाठी होतात. सरकारशी त्याचा काहीही संबंध नसतो, तसेच सरकारसाठी बंधनकारक नसतात, असे काँग्रेसचे जुने नेते नटवर सिंह म्हणतात.