रायपूर - गेल्या काही काळात काँग्रेसची सत्ता असलेल्या विविध राज्यांमध्ये पक्षात आणि सरकारमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले होते. दरम्यान, आता काँग्रेसची निर्विवाद बहुमतासह सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये पक्षात अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसत आहे. राज्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि सरकारमधील ज्येष्ठ मंत्री टीएस सिंहदेव यांच्यामध्ये तीव्र मतभेद झाल्याचे वृत्त येत असल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.
टी.एस. सिंहदेव यांनी पंचायत आणि ग्रामविकास मंत्रालयाचा राजीनामा दिला आहे. आता त्यावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. टीएस सिंहदेव यांनी दिलेला पंचायत मंत्रिपदाचा राजीनामा आपणास अद्याप मिळालेला नाही. तसेच त्यांच्या राजीनाम्याची माहिती आपल्याला माध्यमातून मिळाली, असे बघेल यांनी सांगितले. माझं सिंहदेव यांच्याशी बोलणं झालेलं नाही. काल रात्री त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही, असे बघेल म्हणाले.
छत्तीसगडमधील सत्ताधारी काँग्रेसमध्ये भूपेश बघेल आणि सिंहदेव यांच्यात राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे. दरम्यान, सिंहदेव यांनी शनिवारी पंचायत आणि ग्रामविकास विभागाचा राजीनामा दिला असला तरी ते आरोग्य, कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण आणि जीएसटी विभागांचा कारभार पाहणार आहेत. पीएम आवास योजनेंतर्गत एकही घर बनवलं गेलं नाही. तसेच वारंवार विनंती केल्यानंतरही निधी उपलब्ध केला गेला नाही, असा आरोप सिंहदेव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात केला आहे.
आता राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आज संध्याकाळी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राष्ट्रपती निवडणूक आणि आगामी विधानसभा अधिवेशनाबाबत चर्चा होणार आहे.