काँग्रेस- राजदची आघाडी तुटण्याच्या मार्गावर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 01:04 AM2020-10-02T01:04:11+5:302020-10-02T01:05:11+5:30
Bihar Assembly Election 2020 : काँग्रेसने सुरुवातीच्या चर्चेत ७० जागा सोडण्याचा प्रस्ताव राजदला दिला होता. यासाठी राजद तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने २४२ उमेदवारांची यादी तयार केली आहे.
शीलेश शर्मा ।
नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांच्याविरुद्ध मोर्चा उघडणाऱ्या महाआघाडीतच फूट पडण्याची चिन्हे आहेत. जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांनी यापूर्वीच महाआघाडीशी नाते तोडले आहे. सूत्रांनी सांगितले की, आता काँग्रेस आणि राजद यांच्यात मतभेद वाढले असून त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही? याचा निर्णय आगामी ७२ तासात लालूप्रसाद यादव यांना घ्यायचा आहे.
काँग्रेसने सुरुवातीच्या चर्चेत ७० जागा सोडण्याचा प्रस्ताव राजदला दिला होता. यासाठी राजद तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने २४२ उमेदवारांची यादी तयार केली आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने असेही म्हटले आहे की, भाजपच्या दबावात राजद ही आघाडी तोडण्याच्या विचारात आहे. आता अंतिम निर्णय लालूप्रसाद यादव हे घेणार आहेत. काँग्रेसने शुक्रवारपासून निवडणूक प्रचार सुरु करण्याचे ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पहिली व्हर्च्युअल रॅली घेणार आहेत. बिहारसाठी राहुल गांधी हे ३० ते ३५ सभा घेणार आहेत.