मेहसाणा : काँग्रेसच्या राजकारणातील मॉडेलचा अर्थ आहे घराणेशाही, जातीवाद, सांप्रदायिकता आणि व्होट बँकेचे राजकारण अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली.
उत्तर गुजरातच्या मेहसाणामध्ये एका प्रचार सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, भाजपने कधीही पक्षपात आणि भेदभावाचे समर्थन केले नाही. तरुणांचा सत्तारूढ भाजपवर असलेला विश्वास हेच दर्शवितो.
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबर रोजी होणार आहे. मोदी म्हणाले की, काँग्रेस मॉडेलचा अर्थ आहे भ्रष्टाचार, घराणेशाही. सत्तेत राहण्यासाठी व्होट बँकेचे राजकारण करणे आणि लोकांमध्ये विभाजन करणे यासाठी ते ओळखले जातात. या मॉडेलने केवळ गुजरातलाच नव्हे, तर देशाला बर्बाद केले आहे. याच कारणामुळे देशाला पुढे नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम करावे लागत आहेत.
मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष गरिबांना नेहमीसाठी गरीबच ठेवू इच्छितो. जेणेकरून ते सरकारवर अवलंबून राहतील. भाजपची धोरणे भविष्यासाठी अधिक संधी निर्माण करतील.
राहुल गांधी सद्दाम हुसेनसारखे दिसतात : मुख्यमंत्री सरमा“राहुल गांधी हे इराकी हुकुमशहा सद्दाम हुसेनसारखे दिसतात. त्यांनी सरदार पटेल, पंडित नेहरू किंवा महात्मा गांधीजी यांच्यासारखे राहणीमान ठेवले असते तर बरे झाले असते,” असे वादग्रस्त विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे. सरमा यांनी बोलताना भाषेची मर्यादा लक्षात ठेवावी, असा इशारा काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी दिला आहे.
‘भाजप भीती पसरवते, नंतर हिंसाचारात रूपांतर करते’बोडार्ली (म. प्र.) : “भाजप प्रथम तरुण, शेतकरी आणि मजुरांच्या मनात भीती पसरवते आणि नंतर त्याचे हिंसाचारात रूपांतर करते,” असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान येथे केला. भाजपने आदिवासींवर अन्याय केल्याचा उल्लेख त्यांनी केला. भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेशात दाखल झाली आहे.