काँग्रेसशासित राजस्थानमध्ये काँग्रेसच्या नेत्याला बेदम मारहाण, झाले गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 08:50 AM2021-10-08T08:50:57+5:302021-10-08T08:51:14+5:30
Crime News: राजस्थानमधील बीकानेरमध्ये एका काँग्रेस नेत्याला काही गुंडांनी भररस्त्यात बेदम मारहाण केली. गुंडांनी बीकानेरमधील नोखाचे ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष मेघ सिंह यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली.
जयपूर - राजस्थानमधील बीकानेरमध्ये एका काँग्रेस नेत्याला काही गुंडांनी भररस्त्यात बेदम मारहाण केली. गुंडांनी बीकानेरमधील नोखाचे ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष मेघ सिंह यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत मेघ सिंह गंभीर जखमी झाले. त्यांना बीकानेरमधील पीबीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांना झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीत सिंह यांच्या पायाला १० फ्रॅक्चर झाले. या संदर्भात गुरुवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
मिळलेल्या माहितीनुसार नोखाचे ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष मेघ सिंह गुरुवारी कुटुंबासह देशनोक करणी माताजींचे दर्शन घेऊन माघारी फिरत होते. यादरम्यान, बीकानेर-नोखा रस्तेमार्गावर हिंमतसर गावामध्ये गुंडांनी त्यांची कार मेघ सिंह यांच्या कारसमोर लावून कारसमोर जबरदस्तीने थांबवली. त्यानंतर हल्लेखोरांनी मेघ सिंह यांना कारमधून जबरदस्तीने खेचून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली. जमीनीवर पडलेले सिंह आपल्या बचावासाठी हातपाय मारत होते. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर कुठलीही दयामाया न दाखवता मारहाण केली.
यादरम्यान, सिंह यांच्यासोबत राहत असलेल्या काही नातेवाईकांनी त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. काही लोकांनी सिंह यांना वाचवण्यापेक्षा या मारहाणीचा व्हिडीओ काढणे पसंत केले. हल्लेखोरांनी सिंह यांच्या कारवरदेखील काठ्या मारून तिचे नुकसान केले. त्यानंतर जेव्हा मेघ सिंह गंभीररीत्या जखमी झाले, तेव्हा हल्लेखोर त्यांच्या कारमध्ये बसून फरार झाले. त्यानंतर कुटुंबीय मेघ सिंह यांना तत्काळ बीकानेरच्या पीबीएम रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यामध्ये मेघ सिंह यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. त्यांच्या पायांमध्ये १० फ्रॅक्चर झाले. हा हल्ला कुणी केला आणि का केला, याची माहिती मिळू शकलेली नाही. या संदर्भात गुरुवारी रात्रीपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मात्र पोलिसांनी कुठल्यातरी जुन्या वादातून ही मारहाणीची घटना घडली असावी, असे पोलिसांनी सांगितले.