Congress Sachin Pilot News: लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतरही बहुमत मिळालेल्या एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एनडीएच्या घटक पक्षांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. नरेंद्र मोदी ९ जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी एक सल्ला दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करू नये, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे.
या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला जनतेने नाकारले आहे. नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू नये. भाजपने आत्मपरीक्षण करावे, असे सांगताना सचिन पायलट यांनी ३५ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण करून दिली.
लोकसभा निकाल भाजपा-NDA विरोधात
सन १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींना सुमारे २०० जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना सरकार बनवण्यास सांगितले होते. मात्र, त्यांना जनादेश मिळाला नसल्याचे सांगून त्यांनी नकार दिला. त्यानंतर, पुढच्या सर्वांत मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास सांगितले होते. सध्या लोकसभेचे निकाल हे भाजपा आणि एनडीएच्या विरोधात आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करू नये, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सीबीआय आणि ईडीसारख्या एजन्सीचा भाजपने गैरवापर केला. जनतेने भाजपाच्या 'मंदिर मशीद', हिंदू-मुस्लिम अशा मुद्द्यांना नाकारले आहे. केंद्र सरकारने विशेषत: विरोधकांना लक्ष्य केले. निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले, अशी टीकाही सचिन पायलट यांनी केली.