नवी दिल्ली: 1984 च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयानं दिलेला निर्णय बदलत काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवलं आहे. कुमार यांना शीख विरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत. मात्र हत्या प्रकरणात कुमार यांची मुक्तता झाली आहे.दंगल भडकावणे आणि कटकारस्थान रचणे या गुन्ह्यांसाठी सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना 31 डिसेंबर 2018 पर्यंत न्यायालयाला शरण यावं लागेल. '1947 च्या उन्हाळ्यात फाळणीदरम्यान कित्येक लोकांची कत्तल करण्यात आली. 37 वर्षांनंतर दिल्लीतही अशीच घटना घडली. आरोपी राजकीय संरक्षणाचा फायदा घेत सुनावणीतून सहीसलामत सुटले,' अशा शब्दांमध्ये न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि न्यायमूर्ती विनोद गोयल यांनी निकालपत्राचं वाचन केलं. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये आज काँग्रेस नेते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा निकाल आल्यानं काँग्रेस पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 34 वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमार यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याआधी याच प्रकरणात त्यांची मुक्तता झाली होती. 1 नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीच्या राज नगर भागात पाच शिखांची हत्या झाली होती. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सज्जन कुमार यांची सुटका केली. या निकालाला सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं. दिल्लीच्या कँटॉनमेंटच्या अगदी समोर ही घटना घडली, त्यावेळी प्रशासन नेमकं काय करत होतं, असा प्रश्न सुनावणीवेळी न्यायालयानं विचारला.