राहुल गांधींच्या चेहऱ्यावर दिसला हिरवा लेझर लाइट; काँग्रेसला स्नायपर हल्ल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:49 IST2019-04-11T15:48:15+5:302019-04-11T15:49:20+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

congress says suspicious laser light on rahul gandhi face in amethi | राहुल गांधींच्या चेहऱ्यावर दिसला हिरवा लेझर लाइट; काँग्रेसला स्नायपर हल्ल्याची भीती

राहुल गांधींच्या चेहऱ्यावर दिसला हिरवा लेझर लाइट; काँग्रेसला स्नायपर हल्ल्याची भीती

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहिलं आहे. अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश यांनी मिळून हे पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी अमेठीत पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणी तरी सात वेळा हिरव्या कलरची लेझर लाइट मारली. स्नायपर हल्ल्यात अशी लेझर लाइट वापरली जात असल्याची शक्यताही काँग्रेसनं व्यक्त केली आहे. त्यामुळे  राहुल गांधींच्या जीविताला धोका असून, त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या लिहिलेल्या या पत्राबरोबर पेन ड्राइव्हमध्ये तो हिरव्या लेझर लाइटचा व्हिडीओही पाठवला आहे. काँग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचाही या पत्रात उल्लेख आहे. काँग्रेसनं हा व्हिडीओ जारी केला असून, त्यात 15 सेकंदांपर्यंत चेहऱ्यावर लेझर लाइट मारलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देत आहेत.


राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेठी या मतदारसंघातून जवळपास दोन तास रोड शो केला. त्यानंतर त्यांनी अर्ज भरला. यावेळी त्यांच्याबरोबर बहीण प्रियंका गांधी, भावोजी रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची दोन मुलं उपस्थित होती. यूपीएच्या या रोड शोमध्ये सोनिया गांधींनी सहभाग घेतला नव्हता. त्या थेट राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरणार असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या.
तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर मारण्यात आलेली लाइट ही एआयसीसी छायाचित्रकाराच्या मोबाइल फोनमधील असल्याचीही माहिती समोर आली आहे. अमेठीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी गेले असता, हा फोटोग्राफर राहुल गांधींच्या जवळपास असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title: congress says suspicious laser light on rahul gandhi face in amethi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.