हैदराबाद - काँग्रेसच्या एका नेत्याने राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून पक्षात लोकसभा उमेदवारीचं तिकीट देण्यासाठी करोडो रुपये मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी सदस्य पी. सुधाकर रेड्डी यांनी रविवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र राजीनाम्याच्या अगोदर पी. सुधाकर रेड्डी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहलं आहे.
या पत्रात सुधाकर रेड्डी यांनी लिहलंय की, काँग्रेस पक्षाची विचारधारा, परंपरा आणि मूल्य दुर्देवाने आता पक्षात नाही. 2018 च्या तेलंगणा विधानसभा निवडणूक, एमएलसी निवडणूक आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षात तिकीट वाटपामध्ये प्रचंड प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली आहे. स्थानिक काँग्रेस प्रदेश नेतृत्त्वावर आक्षेप घेत सुधाकर रेड्डी यांनी पक्षात तिकीट वाटपात करोडे रुपये मागत असल्याचा धक्कादायक आरोप केला. काँग्रेस या राजकीय पक्षाचे झालेले बाजारीकरण मला पक्ष सोडण्याचा विचार करण्यासाठी प्रेरित करत आहे. नेतृत्त्वात बदल करण्यासाठी मी प्रयत्न केले मात्र माझे प्रयत्न अयशस्वी ठरले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रत्येकवेळी मी ग्राऊंडची परिस्थिती काँग्रेसच्या हायकमांडकडे मांडण्याचा प्रयत्न केला मात्र पक्षातील काही मंडळींनी माझं म्हणणं काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहचू दिलं नाही. मी काँग्रेसशी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या वागण्याशी नाराज आहे. दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा अशा मुद्द्यांवरही काँग्रेस नेत्यांचे वागण न पटणारं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. देशातील लोकांच्या भावना ओळखण्यात काँग्रेस अपयशी ठरली असल्याचा आरोप पी. सुधाकर रेड्डी यांनी केला.