लखनऊ: उत्तपप्रदेशच्या विधानसभेमध्ये काँग्रेसने पक्षाचा व्हीप झुगारणाऱ्या महिला आमदाराविरोधात सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. ही महिला आमदार खुद्द सोनिया गांधी यांच्याच राय बरेली मतदारसंघातील आहे. यामुळे या घटनेला महत्व प्राप्त झाले आहे.
राय बरेलीमधून आदिती सिंह या आमदार झाल्या आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दिक्षीत यांच्याकडे मंगळवारी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्या आराधना मिश्रा यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आदिती सिंह यांना पक्षाने विशेष अधिवेशनामध्ये उपस्थित न राहण्याचा व्हीप बजावला होता. मात्र, त्या 2 ऑक्टोबरला हजर राहिल्या. भाजपा सरकारने महात्मा गांधींच्या जयंतीनिमितत्त हे अधिवेशन बोलावले होते. तसेच त्यांना याबाबत कारणे दाखवा नोटिसही बजावली होती. मात्र, त्यांचे उत्तर आलेले नाही. यामुळे कायद्यातील कलम 10 तरतुदीनुसार आदिती यांचे सदस्यत्व रद्द करावे.
काँग्रेसने रविवारीच पक्षाची बदनामी करत असल्याच्या कारणावरून 10 नेत्यांना पक्षातून काढून टाकले आहे. लोकसभा निवडणुकीवेऴी आदिती सिंह यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ला झाला होता. जिल्हा पंचायत प्रमुख अवधेश सिंह यांनी हल्ला केल्याचा आरोप आदिती सिंह यांनी केला होता. गांधी कुटुंबाच्या जवळच्या असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अदिती सिंह यांचे नुकतेच लग्नही झाले आहे.