काँग्रेसच्या ज्येष्ठांनी पक्षहितापेक्षा मुलांना दिले महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:59 AM2019-05-27T04:59:18+5:302019-05-27T04:59:36+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशाचे पडसाद पक्षात उमटत आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशाचे पडसाद पक्षात उमटत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि चिदंबरम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षहितापेक्षा मुलांना अधिक महत्त्व दिले. त्यामुळे दुसऱ्या मतदारसंघात त्यांनी लक्ष दिले नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या नेत्यांना रविवारी सुनावले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना एकट्यांना सोडून दिले, अशा शब्दांत राहुल गांधी यांच्या बहीण प्रियांका गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक (सीडब्ल्यूसी) येथे पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष सोडण्याचा यावेळी पुनरुच्चार केला. त्यांनी हे स्पष्ट केले की, या पदावर गांधी परिवारातील व्यक्ती नकोय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या असून, १८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीतून पराभूत झाले आहेत, तर केरळातील वायनाडमधून विजयी झाले आहेत.
या बैठकीस उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले की, चार तास चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर विचारविमर्श करण्यात आला. राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा विषय काढला तेव्हा अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रियांका गांधी यांनी हस्तक्षेप करीत या नेत्यांना सवाल केला की, माझे भाऊ जेव्हा एकटे लढत होते तेव्हा आपण कुठे होतात? प्रियांका यांच्या बोलण्यातून त्यांची व्यथा स्पष्टपणे दिसत होती. प्रियांका म्हणाल्या की, राफेल आणि ‘चौकीदार चोर है’ हे मुद्दे उचलूून धरण्यासाठी राहुल गांधी यांना कोणत्याही नेत्याने समर्थन दिले नाही.
>चिदंबरम यांनी दिली होती राजीनाम्याची धमकी
ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यातील नेतृत्व मजबूत करण्याचा आग्रह केला तेव्हा राहुल गांधी यांनी चिदंबरम यांच्याकडे पाहत म्हटले की, मुलाला तिकीट मिळाले नाही, तर राजीनामा देण्याची धमकी चिदंबरम यांनी दिली होती. बैठकीस अनुपस्थित असलेल्या कमलनाथ यांच्याबाबत राहुल म्हणाले की, कमलनाथ यांनीही मुलाच्या उमेदवारीसाठी खूप आग्रह केला होता, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत मुलाच्या प्रचारासाठी सात दिवस जोधपूरमध्ये होते. तथापि, प्रियांका यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्याला विरोध करीत स्पष्ट केले की, असे केले, तर ते भाजपच्या जाळ्यात फसल्यासारखे होईल.