"वडिलांप्रती पूर्वीप्रमाणेच आदर राहिल," भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेते एके अँटनी यांच्या मुलाचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 09:24 AM2023-04-07T09:24:29+5:302023-04-07T09:25:12+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ, राज्यसभा सदस्य आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत अनिल अँटनी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच अँटनी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “आपला धर्म कुटुंबासाठी काम करणं नाही, तर देशासाठी काम करणं हा आहे,” असं ते यावेळी म्हणाले. 'धर्मो रक्षति रक्षितः' या संस्कृत श्लोकाचा संदर्भ देत ते म्हणाले, "आजकाल काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कुटुंबासाठी काम करणं हाच आपला धर्म वाटतो. राष्ट्रासाठी काम करणं हाच माझा धर्म आहे.”
विकसित राष्ट्र बनवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी स्पष्ट आहे आणि यामध्ये योगदान देणं हे आपलं कर्तव्य असल्याचं म्हणत अँटनी यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं. अनिल अँटनी यांनी या वर्षी जानेवारी महिन्यात काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. ते काँग्रेसच्या केरळ युनिटच्या डिजिटल मीडिया विभागाचे प्रमुखही राहिले आहेत. भाजपमध्ये येण्यापूर्वी वडिलांशी सल्लामसलत केली होती का, असा प्रश्न अनिल अँटनी यांना विचारण्यात आला होता. "हे व्यक्तिमत्त्वाबद्दल नाही, ते विचार आणि मतभेदांबद्दल आहे. मी योग्य पाऊल उचललं आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. माझ्या वडिलांबद्दलचा माझा आदर तसाच राहील,” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.