Congress Shashi Tharoor: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासह अनेकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी हा अंतरिम नाही अंतिम अर्थसंकल्प असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीचे निकाल अद्याप आलेले नाही, असे सूचक विधान केले आहे.
केंद्र सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प निराशाजनक आहे. अर्थमंत्र्यांच्या भाषणातून बेरोजगारीचा मुद्दा पूर्णपणे गायब होता. सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारण्याच्या बाबतीत सरकारला एफ म्हणजेच फेल ग्रेड दिली जाईल. महागाई, विशेषत: खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ इतकी धक्कादायक आहे की, देशातील २० टक्के जनता ते खरेदी करण्यासाठी सक्षम नाही, असा दावा शशी थरूर यांनी केला.
सामान्य भारतीयांच्या जीवनातील हेच वास्तव आहे. म्हणूनच राम मंदिराचा अभिमान बाळगून लोकांनी मतदान करावे किंवा बालाकोट, पुलवामाप्रमाणे पाकिस्तानवर केलेल्या कथित हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले हा गर्व बाळगून मतदान करावे, असे केंद्र सरकारला वाटत आहे. २०१९ मध्ये भाजपाला अशाच पद्धतीने यश मिळाले होते, अशी टीका शशी थरूर यांनी केली.
दरम्यान, यावेळी राम मंदिराचा मुद्दा घेतला जाईल. त्यात अबुधाबी मंदिराची भर पडणार यात शंका नाही. साहजिकच अशी कामे करण्यासाठी सरकार निवडले जात नाही. सरकार हे सर्वसामान्यांचे जीवन सुधारण्यासाठी निवडून दिलेली असतात. हे या सरकारने केले का? मी म्हणेन की त्या विशिष्ट निकषावर केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, या शब्दांत शशी थरूर यांनी निशाणा साधला.