बेळगाव : येत्या २१ जानेवारी रोजी येथे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अधिवेशन होणार असल्याची घोषणा बुधवारी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने केली. या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे केंद्रीय नेते उपस्थित राहणार आहेत.२७ डिसेंबर २०२४ रोजी नियोजित असलेला हा कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे पुढे ढकलला होता. आता येत्या २१ जानेवारी रोजी होणारे अधिवेशन म्हणजे १९२४ मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनातील महात्मा गांधींच्या ऐतिहासिक अध्यक्षपदाच्या शताब्दी उत्सवाचा एक भाग आहे.
केपीसीसीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एआयसीसीचे संघटनात्मक सचिव आणि खासदार के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन कार्यक्रमाच्या तयारीबाबत चर्चा केली.