अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का! ४ आमदारांचा भाजपा प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 10:33 AM2024-02-26T10:33:11+5:302024-02-26T10:34:36+5:30
Arunachal Pradesh BJP Vs Congress News: महाराष्ट्रानंतर आता अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.
Arunachal Pradesh BJP Vs Congress News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. जागावाटप आणि उमेदवारी यांबाबतच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यातच काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. महाराष्ट्रातून काही बडे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि भाजपामध्ये प्रवेश केला. अरुणाचल प्रदेशमध्ये आता आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी आमदारांचे पक्षात स्वागत केले.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली. काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग आणि वांगलिन लोवांगडोंग यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) मुत्चू मिथि आणि गोकर बसर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या चार आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश होणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलेल्या सुशासनाच्या तत्त्वांचा, विश्वासाचा पुरावा आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधानांच्या परिवर्तनवादी नेतृत्वाने देशभरात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. या पक्षप्रवेशाने आमदारांच्या मतदारसंघात सकारात्मक बदल घडून येतील. अरुणाचल प्रदेशात आमचा पाया मजबूत होईल, असे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी राज्य, लोकसभा निवडणूक प्रभारी आणि आसाममंत्री अशोक सिंघल उपस्थित होते. एकत्रितपणे, सर्वसमावेशक विकास आणि लोककेंद्रित कल्याणाच्या तत्त्वांसाठी आमची वचनबद्धता सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत, असेही ते म्हणाले.