काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज एक महिना पूर्ण होत आहे. आज यात्रेचा ३१ वा दिवस आहे. आज शनिवारी कर्नाटकातील तुमकुरु येथील मायासांद्रा येथून यात्रेला सुरुवात झाली. राहुल गांधी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत काग्रेसचे हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहेत. दोन दिवसापूर्वी कर्नाटकात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या.
काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन भारत जोडो यात्रेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात सोनिया गांधी यात्रेत सहभागी झाल्याचे दिसत आहे. “भारत जोडो यात्रेला आईचा आशीर्वाद, जनतेचा पाठिंबा मिळत आहे. आम्ही देशवासियांना वचन देतो की ही यात्रा परस्पर सौहार्द, बंधुभाव वाढवण्याबरोबरच ज्वलंत मुद्दे मांडेल,अशी कॅप्शन दिली आहे.
शुक्रवारी या यात्रेत कर्नाटकातील अनेक मोठे नेते सहभागी झाले. यात दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहिणी सहभागी झाले होते.यावेळी गौरी लंकेश यांच्या आई इंदिरा लंकेश आणि त्यांची बहीण कविता लंकेश राहुल गांधींसोबत पायी चालताना दिसल्या.