नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Congress Shashi Tharoor) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 'ओ मित्रो' या लोकप्रिय शब्दाची खिल्ली उडवली आहे.
पंतप्रधान मोदी भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी 'मित्रो' या शब्दाचा वापर करतात. शशी थरूर यांनी 'ओ मित्रो' या शब्दाची तुलना आता कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटसोबत केली आहे. 'ओ मित्रो' हे ओमाक्रॉनपेक्षा कितीतरी जास्त धोकादायक आहे असं म्हटलं आहे. शशी थरूर यांनी आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये "ओमायक्रॉनपेक्षा कितीतरी जास्त धोकादायक 'ओ मित्रो' आहे. दररोज आपण देशात वाढलेले ध्रुवीकरण, द्वेष आणि धर्मांधतेला चालना, संविधानावरील हल्ले आणि आपली लोकशाही कमकुवत होताना पाहत आहोत. या व्हायरसचा कोणताही ‘सौम्य प्रकार’ नाही" असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. थरूर यांच्या या ट्विटला भाजपाने उत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी देशात कोरोना व्हायरसची गंभीर परिस्थिती असताना असे राजकारण करणे चुकीचे आहे असं म्हटलं आहे. शहजाद पूनावाला यांनी "काँग्रेस महामारीला राजकारणाच्या वर ठेवू शकते का? आधी काँग्रेसने लसीबद्दल लोकांमध्ये संभ्रम पसरवला आणि आता म्हणतात की ओमायक्रॉन धोकादायक नाही. कोरोनाच्या सुरुवातीला अखिलेश यादव म्हणाले होते, की CAA करोना व्हायरसपेक्षा धोकादायक आहे. या लोकांना जबाबदारीची जाणीव नाही का? त्यांच्यासाठी कोरोनाला विरोध करण्यापेक्षा मोदींना विरोध करणं महत्त्वाचं झालं आहे का?" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.