आउट होऊनही काँग्रेसला सतत हवी असते बॅटिंग- पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 05:59 AM2018-02-08T05:59:17+5:302018-02-08T06:01:53+5:30

भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली.

Congress should always keep batting outright: PM | आउट होऊनही काँग्रेसला सतत हवी असते बॅटिंग- पंतप्रधान

आउट होऊनही काँग्रेसला सतत हवी असते बॅटिंग- पंतप्रधान

Next

सुरेश भटेवरा 
नवी दिल्ली : भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना, मोदींनी दोन्ही सभागृहांत दीड तासांची भाषणे केली. त्या वेळी सभागृहांत काँग्रेस, तेलगू देसमसह अन्य विरोधकांची घोषणाबाजी व गदारोळ सुरू होता.
त्यानंतर, काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले की, मोदींच्या भाषणांचा बाज निवडणूक प्रचाराचा होता. गांधी-नेहरू परिवार व काँग्रेसच्या ५५ राजवटीवर, टीका करताना, आपली कारकिर्द संपत आल्याचे ते विसरून गेले. ज्या मुद्द्यांवर त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला, त्यापैकी एकाही विषयाचे उत्तर मोदींना ४ वर्षांत शोधता आले नाही.
मोदी म्हणाले, यूपीए सरकार असताना सरकारी बँकांचा १८ लाख कोटींचा एनपीए ५२ लाख कोटींवर गेला. बँकांची ही लूट कोणी घडविली? हे पाप आमच्या सरकारचे नाही. आमच्या काळात बँकांनी एकही असे कर्ज दिले नाही की, ज्यामुळे बँकांच्या एनपीएमध्ये भर पडली.
>सभागृहांमध्ये रणकंदन
पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना दोन्ही सभागृहांत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे रणकंदनच सुरू होते.
मोदींच्या प्रत्येक मुद्द्यावर सत्ताधारी सदस्य बाके वाजवून विरोधकांना खिजवायचे, तर काँग्रेससह अन्य विरोधक या वेळी ‘पंतप्रधान मोदी जुमलेबाजी बंद करो’, ‘झूठा भाषण बंद करो, मॅच फिक्सिंग बंद करो’, ‘आंध्र प्रदेशके मुद्देपर ड्रामेबाजी बंद करो’, ‘धमकी देना बंद करो, झांसा देना बंद करो’, ‘राफेल डिल मे क्या हुवा?; अशा घोषणा देत होते. या गोंधळातच पंतप्रधानांचे भाषण पार पडले.
> राक्षसी हास्य
बोलण्याच्या ओघात मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचे श्रेय लालकृष्ण अडवाणींना दिले, तेव्हा काँग्रेसच्या रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या.
सभापती नायडू त्यांच्या हास्यावर नाराजी व्यक्त करीत असतानाच त्यांना थांबवून मोदी यांनी ‘रामायण’ या मालिकेनंतर बºयाच वर्षांनी असे हास्य ऐकायला मिळाले,’ असा कडवट शेरा मारून, चौधरी यांच्या हसण्याची तुलना राक्षसी हास्याशी केली.
>मलाही हवा गांधीजींचाच भारत
राज्यसभेत पंतप्रधान म्हणाले की, ‘आउट झाल्यावरही काँग्रेसला सतत बॅटिंग हवी असते. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत अनेक वर्षे सत्ता काँग्रेसकडे होती. मात्र, त्याचे सारे श्रेय एका कुटुंबालाच दिल्याने तो पक्ष आज विरोधी बाकांवर आहे. यंग इंडियाचे स्वप्न स्वामी विवेकानंदांनीही पाहिले होते. विरोधकांना न्यू इंडिया नको असेल, तर ठीक आहे, मलाही गांधींचा भारत हवा आहे, पण काँग्रेसमुक्त भारत ही काही माझी कल्पना नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधींनीच तशी इच्छा व्यक्त केली होती. आता देशाने ठरवावे की, त्यांना कोणता भारत हवाय.’
>बेनामी संपत्ती पकडली
आपल्या प्रदीर्घ भाषणात केंद्र सरकारने रेल्वेचे बजेट रद्द का केले, ३,५00 कोटींची बेनामी संपत्ती प्रथमत: कशी पकडली, शेतीसाठी राबविलेल्या विविध योजना, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प, बांबूच्या शेतीला प्रोत्साहन, उज्ज्वला योजना, तीन तलाक विधेयक, स्वच्छ भारत अभियान इत्यादी योजनांच्या यशाचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला.
>दलाल व मध्यस्थ संपविले
चुकीच्या धोरणांमुळे देशाचे किती नुकसान झाले, याची उदाहरणे सांगताना काँग्रेसवर हल्ला चढविण्याची एकही संधी मोदींनी सोडली नाही. ते म्हणाले, आधार कार्डाचा उपयोग आम्ही वैज्ञानिक रितीने केला. काँग्रेस राजवटीत विधवा, दिव्यांग, ज्येष्ठांची पेन्शन दलालांच्या खिशात जात होती. आम्ही दलाल व मध्यस्थ संपविले. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांतही १ कोटीहून अधिक लोकांना रोजगार मिळाला. विरोधक त्यालाही खोटे ठरविणार काय?

Web Title: Congress should always keep batting outright: PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.