नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधीवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला विरोध केला होता. इतकचं नाही तर राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचा हवाला देत पाकिस्ताने संयुक्त राष्ट्र संघाला पत्र लिहिलं होतं. त्यामुळे भारताच्या विरोधात राहुल गांधींचे भाषण वापरले जाते याची काँग्रेसला लाज वाटायला हवी अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी काँग्रेसवर केली आहे.
मागील संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असा निर्णय घेतला. कलम 370 आणि 35 ए हे देशाच्या ऐक्याला बाधा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाने पुन्हा पंतप्रधान केलं. त्यामळे पहिल्याच अधिवेशनात त्यांनी कलम 370 हटविण्याचा धाडसी निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कोणालाच हे जमलं नसतं असं कौतुक अमित शहांनी केलं.
अमित शहांनी सांगितले की, कलम 370 हटविण्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विकासाचा मार्ग खुला झाला आहे. दहशतवाद्यांवर दबाव ठेवण्याचं काम केलं जात आहे. काश्मीरला पूर्णपणे भारताच्या सोबत आणलं आहे. सर्व लोक या निर्णयाच्या पाठिशी आहेत मात्र काही जण याचा विरोध करतात. काँग्रेसने कलम 370 हटविण्याला विरोध केला. आजही राहुल गांधी भाषण देतात त्याचं कौतुक पाकिस्तानात केलं जातं. त्यांच्या भाषणाचा उल्लेख भारताच्या विरोधात केला जातो याबाबत काँग्रेसला लाज वाटायला हवी असं त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिलेल्या विधानाचा हवाला देत काश्मीरमधील स्थिती खराब असल्याचा दावा केला होता. मात्र राहुल गांधींच्या विधानाचा वापर पाकिस्तानने केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशा दावा केला होता.