"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 08:17 PM2024-11-15T20:17:12+5:302024-11-15T20:18:48+5:30
काँग्रेस महासचिव तथा झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी गुरुवारी आश्वासन दिले आहे की, जर आपला पक्ष सत्तेत आला, तर घेसखोर असोत अथवा नसो, राज्यातील सर्व नागरिकांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर दिला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप-काँग्रेस समोरा-समोर आले आहेत...
आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे भाजपचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. सरमा म्हणाले, मीर यांनी घुसखोरांना एलपीजी सिलिंडर देणार असल्याचे म्हटले आहे. हे सर्व काँग्रेसच्या व्होट बँकेला खूश करण्यासाठी केले जात आहे.
हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, "गुलाम अहमद मीर म्हणतात की, ते घुसखोरांना स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर देतील, ते घुसखोरांना "माती आणि बेटी" दोन्ही देत आहेत, कारण ते काँग्रेसची व्होटबँक आहेत. ही भाषा राहुल गांधींची आहे. ते (गुलाम अहमद मीर) राहुल गांधींचा पाठींबा असल्याशिवाय असे बोलू शकत नाहीत. घुसखोरांसह, आपण काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे."
या वक्तव्यावरून पेटलाय वाद? -
काँग्रेस महासचिव तथा झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी गुरुवारी आश्वासन दिले आहे की, जर आपला पक्ष सत्तेत आला, तर घेसखोर असोत अथवा नसो, राज्यातील सर्व नागरिकांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर दिला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप-काँग्रेस समोरा-समोर आले आहेत.
'इंडिया' आघाडीचे स्पष्टीकरण -
यासंदर्भात बोलताना, झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीने म्हटले आहे की, भाजप गुलाम अहमद मीर यांच्या विधानाचा विपर्यास करत आहे. तर, झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते मनोज पांडे म्हणाले, "घुसखोरांसंदर्भात भाजपची जी व्याख्या आहे, त्यात घुसखोर म्हणजे मुस्लीम आहेत. ही भाजपची विचारसरणी आहे. यासंदर्भात गुलाम अहमद मीर म्हणाले की, आमच्या आश्वासनानुसार सर्व धर्मातील लोकांना सिलिंडर मिळेल. यात, कोण हिंदू आहे आणि कोण मुसलमान हे बघितले जाणार नाही, सर्वांना सिलिंडर मिळेल."