रांची - गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. महाराष्ट्राचीही या कायद्यासंदर्भात संदिग्ध भूमिका आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये या कायद्याविरुद्ध मोठं आंदोलन पुकारण्यात आलंय. या आंदोलनाची धग देशभरात जाणवत असून हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेससहनागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यांना टोला लगावलाय. तसेच, काँग्रेसला आव्हानही दिलंय.
नरेंद्र मोदींनी झारखंडमधील बरहैत येथील सभेला संबोधित करताना, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यावर निशाणा साधला. आर्टीकल 370 वेळेसही काँग्रेसने असाच गोंधळ घातला होता. आर्टीकल 370 काढले तर करंट बसेल, वातावरण चिघळेल, असा संभ्रम निर्माण केला होता. मात्र, तुम्हीच पाहिलं, 370 हटविल्यानंतर आता काश्मीरमध्ये शांतता आहे. काँग्रेस केवळ आपलं राजकारण करण्यासाठी या कायद्याला विरोध करत आहे. नागरिकता सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष अफवा पसरवत आहेत, हिंसाचार घडवत आहेत. या कायद्यामुळे हिंदु-मुस्लीम-शिख-ईसाई, देशातील एकाही नागरिकाच्या नागरिकत्वास धोका होणार नाही, असे मोदींनी सांगितले. तसेच, मी काँग्रेस पक्षाला आव्हान देतो की, हिंमत असेल, पाकिस्तानच्या नागरिकांना नागरिकता देणार अशी घोषणा काँग्रेसने करावी, असे मोदींनी म्हटले.
जर काँग्रेसमध्ये हिंमत असेल, तर जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आर्टीकल 370 लागू करा. तीन तलाकविरुद्ध जो कायदा बनलाय, तो रद्द करणार, असं काँग्रेसने जाहीरपणे सांगावं. विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, असे मोदींनी आपल्या झारखंडमधील भाषणात म्हटले. आम्ही जो कायदा बनवलाय तो, बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगानिस्तामधून धार्मिक अत्याचारासाठी आपल्या देशात येणाऱ्या लोकांसाठी हा कायदा बनवलाय, असे मोदींनी सांगितले. देशाला बरबाद करण्याचं काम का करताय? देशातील मुस्लिम नागरिकांना का भिती दाखवताय, असे म्हणत मोदींनी नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांना लक्ष केले.