नवी दिल्ली - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडून दिल्यास येथील नागरिकांना 600 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले. त्यावर सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेसने आधी सत्ता असलेल्या राज्यांमध्ये वीज मोफत करू दाखवावी, असं आवाहन केजरीवाल यांनी केले. केजरीवाल सरकारकडून सध्या दिल्लीतील नागरिकांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळते.
झारखंडनंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने अद्याप दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली नाही. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. यांनतर काँग्रेसनेही दिल्लीवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे.
केजरीवाल म्हणाले की, मला आनंद आहे की, आम आदमी पक्षाचे काम इतर पक्षांना देखील चांगले वाटत आहे. ही चांगली गोष्ट आहे. काँग्रेसने दिल्लीत वीज मोफत करण्यापूर्वी त्यांची सत्ता असलेल्या पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये 600 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी. अन्यथा लोकांना माहितच आहे हा जुमला आहे. एकूणच मोफत वीज देण्यावरून आता काँग्रेस आणि आपमध्ये जुगलबंदी सुरू झाली आहे. तर भाजप अद्याप यापासून दूर आहे.