ऑनलाइन लोकमत
पूर्णिया (बिहार), दि. २ - असहिष्णूतेवरुन टीका करणा-या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलटवार केला आहे. शीखांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या काँग्रेसने असहिष्णूतेवरुन भाषण देऊ नये असे प्रत्युत्तर नरेंद्र मोदींनी दिले आहे.
दादरीतील घटनेनंतर देशात असहिष्णूतेचे वातावरण पसरल्याची टीका केंद्र सरकारवर केली जात आहे. काँग्रेसने या प्रकरणी राष्ट्रपतींची भेट घेण्याची तयारी सुरु केली आहे. या आरोपांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील सभेत समाचार घेतला. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखांची खुलेआम हत्या करण्यात आली. पिडीतांना अद्याप न्याय मिळालेला नाही. याप्रकरणात काँग्रेसवरही आरोप झाले होते. पण आज तोच काँग्रेस पक्ष असहिष्णूतेवर भाषण देत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या महाआघाडीचा उल्लेख करत मोदी म्हणाले, जंगलराजचा मोठा फटका महिलांना बसतो. यंदा बिहारमधील महिला मोठ्या प्रमाणात मतदान करत असून या महिलांचे स्वप्न आम्ही पूर्ण करु असे आश्वासनही त्यांनी दिले.