"नितीन गडकरींबाबत नेमकं हेच घडलंय"; 'तो' Video शेअर करत काँग्रेसचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:33 PM2022-08-19T12:33:03+5:302022-08-19T12:35:06+5:30
Congress Slams BJP : काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधानपदाच्या दावेदारीमुळेच गडकरींना वगळण्यात आल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली - भाजपमधील मोठ्या संघटनात्मक बदलांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आले आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. निवडणूक समिती ही महत्त्वाची समिती असून लोकसभा आणि राज्यसभेसाठी ती उमेदवारांची निवड करते. फडणवीस यांची ही निवड राष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या वाढत्या आलेखाचे संकेत मानले जात आहे. यावरूनच काँग्रेसने (Congress) एक खोचक ट्विट केलं आहे.
"नितीन गडकरींबाबत नेमकं हेच घडलंय" असं म्हणत भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधानपदाच्या दावेदारीमुळेच गडकरींना वगळण्यात आल्याचं म्हटलं आहे. "जो कोणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींबाबत नेमकं हेच घडलंय" असं काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
जो प्रधानमंत्री का प्रतिद्वंद्वी होगा, उसको बाहर का रास्ता दिखा दिया जाएगा।
— Congress (@INCIndia) August 18, 2022
यही हुआ है नितिन गडकरी के साथ। pic.twitter.com/eRJX5hoHGD
संसदीय बोर्डाचे सर्व ११ सदस्य हे निवडणूक समितीचे सदस्य आहेत. जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा यात समावेश आहे. याशिवाय अन्य सात जणात कर्नाटकातून बी. एस. येडियुरप्पा, आसाममधून सर्बानंद सोनोवाल, तेलंगणातून के. लक्ष्मण, पंजाबचे इक्बाल सिंग लालपुरा आणि हरयाणातील सुधा यादव यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, येडियुरप्पा आणि जतिया यांचा समावेश करून ७५ वर्षांच्या नियमालाही बाजूला ठेवले आहे.
संसदीय मंडळातून नितीन गडकरींना वगळले; देवेंद्र फडणवीसांना निवडणूक समितीत स्थान
भाजपच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संसदीय मंडळातून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना वगळल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवराजसिंह चौहान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे समर्थक आहेत. एक ज्येष्ठ मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व व्यंकय्या नायडू यांचे निष्ठावंत म्हणून ते ओळखले जातात. नितीन गडकरी हे भाजपचे अध्यक्ष असताना ते गडकरी यांचेही निकटवर्तीय होते. ते जवळपास १७ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नवीन घोषणा, लोकप्रिय योजना जाहीर करणारे व कठोर मेहनत घेणारे मुख्यमंत्री असूनही ते सुशासन देऊ शकलेले नाहीत.