ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - बोफोर्स प्रकणातल्या क्वात्रोची आणि भोपाळ गॅसगळतीतल्या अँडरसनला मदत करणा-या काँग्रेसने ख-या अर्थी भगोड्यांना मदत केल्याचा घणाघाती आरोप करत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेच्या अधिवेशनात ललित मोदीगेट प्रकरणातील आरोपांना सडेतोड उत्तर दिले.
ललित मोदींकडून माझ्या कुटुंबियांना किती पैसे मिळाले असं विचारणा-या राहूल गांधींनी आपल्या आईला विचारावं की क्वात्रोचीकडून किती पैसे मिळाले, अँडरसनकडून किती पैसे मिळाले असा थेट हल्लाबोल करत सुषमा स्वराज यांनी माझं अनेक दशकांचं राजकीय आयुष्य हे अत्यंत स्वच्छ असल्याचा दावा केला आणि कुठलाही गैरव्यवहार आपण केला नसल्याचे सांगितले. भोपाळ वायुगळतीमध्ये १५ हजार लोकांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणातील युनियन कार्बाईडच्या वॉरेन अँडरसनना अवघ्या २५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले आणि देशाबाहेर जाऊ देण्यात आले. त्यांच्या सुटकेनंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये राजीव गांधींचे बालमित्र व नेहरू कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे असे मोहम्मद युनूस यांचा मुलगा आदिल शहरयार याला अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी शिक्षा माफ केली. आदीलला अत्यंत गंभीर गुन्ह्यासाठी ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. परंतु अँडरसनला सोडण्याच्या बदल्यात आदीलला माफी मिळवून घेत राजीव गांधींनी देशाला फसवल्याचा खळबळजनक आरोप स्वराज यांनी लोकसभेच्या अधिवेशनात केला आहे. आत्तापर्यंत या घटनेची चर्चा खासगीत किंवा इंटरनेटच्या माध्यमातून होत होती, मात्र, आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी स्वराज यांनी संसदेच्या अधिवेशनात तोफ डागली.
स्वराज यांनी माजी अर्थमंत्री पी, चिदंबरम यांच्यावरही टीकेचा भडीमार केला. चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांच्या पत्नीला इन्कम टॅक्स खात्याने वकिलपत्र दिले हा गैरव्यवहार होता असे त्या म्हणाल्या. तसेच शारदा चिट फंड घोटाळ्यात त्यांनी आरोपींचे वकिलपत्र एक कोटी रुपयांसाठी घेतले ज्यामध्ये सरकार पक्षकार होता व चिदंबरम अर्थमंत्री होते हा प्रकार गैरव्यवहार म्हणता येईल असेही त्यांनी पुढे सांगितले.
दिवसभर प्रचंड गोंधळात सुरू असलेल्या लोकसभेच्या कामकाजात काँग्रेसच्या मल्लिकाज्रुन खर्गे यांनी सुषमा स्वराज यांच्यावर आक्रमक शैलीत आरोप करताना त्यांनी ललित मोदींना सहाय्य केल्याचा, कायदे धुडकावल्याचा तसेच कुटुंबियांना मोदींकडून आर्थिक लाभ झाल्याचा आरोप केला.
स्वराज यांनी माझ्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा गैररीत्या घेतला नसल्याचे सांगितले.
मात्र, काँग्रेसने भगोड्याला मदत केल्याचा आरोप करू नये कारण त्यांच्या पंतप्रधानांनी राजीव गांधींनी अँडरसनला देशाबाहेर जाण्यास मदत केली. हा प्रकार काँग्रेसचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष व मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांनीच त्यांच्या आत्मचीरात्रात लिहून ठेवला असल्याचे सांगत स्वराज यांनी त्यासंबंधातले उतारे वाचून दाखवले.
भाजपा सरकार ललित मोदी पासपोर्ट प्रकरणात अपीलात का गेले नाही यावर बोलताना काँग्रेसच्या काळात सक्तवसुली संचालनालयाने चार वर्षे काहीच केले नाही म्हणून अपीलात जाता आले नाही असे सांगत आता त्यासंदर्भातली कारवाई सुरू केली असल्याचे स्वराज म्हणाल्या.