भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं; काँग्रेसचं मोदींना प्रत्युत्तर, फोटो ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 10:41 AM2023-08-17T10:41:42+5:302023-08-17T11:00:04+5:30
Congress Slams Narendra Modi : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आता नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत निशाणा साधला आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि विकसित देशाच्या निर्माणाचा वज्रनिर्धार व्यक्त केला. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करून द्यायची असून त्यासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि निष्पक्षपात या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. तसेच भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगूलचालन या तीन वाईट प्रवृत्तींमुळे देशाचा विकास खोळंबला होता, असा दावाही मोदी यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसला देखील टोला लगावला.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आता नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत निशाणा साधला आहे. "मोदीजी भ्रष्टाचारावर बोलत होते..." असं म्हणत काही नेत्यांचे फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, नारायण राणे, हसन मुश्रिफ यांच्यासह जय पांडा, हिमंता बिश्व सरमा, सुवेंदु अधिकारी, शिवराज सिंह चौहान, बीएस बोम्मई, रघुवर दास, पेमा खांडू यांचे फोटो देखील आहेत.
मोदी जी भ्रष्टाचार की बात कर रहे थे pic.twitter.com/bNV5gqGUxi
— Congress (@INCIndia) August 16, 2023
पंतप्रधानांनी देशवासीयांमध्ये एक मजबूत राष्ट्रनिर्मितीची पूरेपूर क्षमता असून केवळ भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण आणि लांगूलचालन हे या मार्गावरील मुख्य अडथळे होते. गेल्या ७५ वर्षांत काही विकृती समाजात निर्माण झाल्या असून त्यांचा समूळ नायनाट करणे हे आपल्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
परिवारवाद आणि घराणेशाही हे सामाजिक न्यायाच्या प्रतिभेचे शत्रू आहेत, ते गरीबांची क्षमता नाकारतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. म्हणूनच या देशातील लोकशाहीच्या बळकटीसाठी कुटुंबवादापासून मुक्ती मिळणे आवश्यक आहे. सर्वजन हिताचा आणि सर्वजन सुखाचा हक्क प्रत्येकाला मिळायला हवा. त्यामुळे सामाजिक न्यायाचीही गरज आहे. तुष्टीकरणाने सामाजिक न्यायाची सर्वात मोठी हानी केली आहे. कोणी सामाजिक न्याय नष्ट केला असेल, तर या तुष्टीकरणाच्या विचारसरणीने, तुष्टीकरणाच्या राजकारणाने, तुष्टीकरणाच्या योजनांनी सामाजिक न्यायाचा घात केला आहे. भ्रष्टाचार हा विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे मोदी म्हणाले.