मोदींनी तर देशाचाच ऍक्सिडंट केला; 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या ट्रेलरवरून काँग्रेसचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:36 PM2018-12-27T15:36:34+5:302018-12-27T15:45:33+5:30
चित्रपटातील संवादांबद्दल काँग्रेसला आक्षेप; सत्यजित तांबे कोर्टात जाणार
मुंबई: 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाविरोधात काँग्रेस न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे. या चित्रपटातील अनेक संवादांवर काँग्रेसनं आक्षेप नोंदवला. या चित्रपटाविरोधात न्यायालयात जाणार . मनमोहन सिंगपंतप्रधान असताना काँग्रेस हायकमांडकडे असलेला रिमोट कंट्रोल, एकापाठोपाठ एक बाहेर येणारे घोटाळे, या परिस्थितीमधील सिंग यांची अगतिकता या चित्रपटाच्या ट्रेलरमधून दाखवण्यात आली आहे.
'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या ट्रेलरमधील अनेक संवादांवर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधानमनमोहन सिंग आणि काँग्रेसची बदनामी करणारा असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. राजकीय फायद्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचा दावादेखील त्यांनी केला. 'लोकसभा निवडणूक जवळ आहे. त्यामुळे दुसऱ्याला बदनाम करून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा हा प्रकार आहे. ज्या मनमोहन सिंग यांना ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हटलं जातंय, त्यांनी अतिशय अवघड स्थितीतून देशाला बाहेर काढलं. त्यांच्या काळात देशाची सर्वांगीण प्रगती झाली. मात्र आताच्या पंतप्रधानांनी देशाचाच ऍक्सिडंट केला,' अशा शब्दांमध्ये सावंत यांनी थेट मोदींवर निशाणा साधला. स्वत:ला मोठं होता येत नसेल, तर दुसऱ्याला लहान दाखवलं जातं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट, असा टोलादेखील त्यांनी लगावला.
'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटात अभिनेते अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका अतिशय सक्षमपणे सांभाळल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे. तर अभिनेता अक्षय खन्नानं सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारुंची व्यक्तिरेखा साकारली आहे. संजय बारु मे २००४ ते ऑगस्ट २००८ या कालावधीत सिंग यांचे माध्यम सल्लागार आणि प्रमुख प्रवक्ते होते. त्यांनी लिहिलेल्या 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावरुन चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. विजय गुट्टे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.