49 महिन्यांमध्ये स्विस बँकेतील काळा पैसा पांढरा झाला का?; काँग्रेसचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 03:50 PM2018-06-30T15:50:28+5:302018-06-30T15:54:27+5:30
अर्थमंत्री अरुण जेटलींच्या विधानाचा समाचार
नवी दिल्ली: स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरुन काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदी पंतप्रधान होण्याआधी जो पैसा काळा होता, तो 49 महिन्यांमध्ये पांढरा झाला, अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे.
'मे 2014 च्या आधी स्विस बँकेतील पैसा काळा होता. मोदी सरकारच्या 49 महिन्यांच्या सत्ताकाळात मात्र हा पैसा पांढरा झाला आहे,' असं ट्विट करत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशात वाढ झाल्याचं वृत्त येताच मोदी सरकारमधील दोन वरिष्ठ मंत्री सरकारच्या बचावासाठी पुढे आले. यावरुनही सुरजेवाला यांनी सरकारवर शरसंधान साधलं. 'एकाचवेळी दोन अर्थमंत्री (?) स्विस बँकेतील खातेधारकांच्या बचावासाठी पुढे आले. हा पैसा बेकायदा नसल्याचं दोघेही मंत्री सांगत आहेत,' असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Pre May 2014, Money in Swiss Banks was ‘Black’.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 30, 2018
In 49 months of Modi Govt,it turned ‘White’.
While the 2 FM’s(?) defend ‘Swiss Bank A/C Holders’ saying it’s not ‘Illegal’, CBDT says no information on Swiss Bank A/C would be available till Sept 2019.
FAIR & LOVELY LIES OF FM’s? pic.twitter.com/Oc7758WruC
स्विस बँकेतील सर्व पैसा काळा नसल्याचं म्हणत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारचा बचाव केला होता. या विधानाचाही सुरजेवाला यांनी समाचार घेतला. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीयांच्या खात्यातील रकमेत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे स्विस बँकेतून काळा पैसा भारतात आणू म्हणणाऱ्या सरकारनं देशातील काळा पैसा भारताबाहेर घालवला, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.