नवी दिल्ली: स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरुन काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदी पंतप्रधान होण्याआधी जो पैसा काळा होता, तो 49 महिन्यांमध्ये पांढरा झाला, अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. 'मे 2014 च्या आधी स्विस बँकेतील पैसा काळा होता. मोदी सरकारच्या 49 महिन्यांच्या सत्ताकाळात मात्र हा पैसा पांढरा झाला आहे,' असं ट्विट करत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशात वाढ झाल्याचं वृत्त येताच मोदी सरकारमधील दोन वरिष्ठ मंत्री सरकारच्या बचावासाठी पुढे आले. यावरुनही सुरजेवाला यांनी सरकारवर शरसंधान साधलं. 'एकाचवेळी दोन अर्थमंत्री (?) स्विस बँकेतील खातेधारकांच्या बचावासाठी पुढे आले. हा पैसा बेकायदा नसल्याचं दोघेही मंत्री सांगत आहेत,' असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
49 महिन्यांमध्ये स्विस बँकेतील काळा पैसा पांढरा झाला का?; काँग्रेसचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 3:50 PM