दिव्या स्पंदना यांचं ट्विटर अकाऊंट बंद, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 04:39 PM2019-06-02T16:39:07+5:302019-06-02T16:52:44+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या माजी खासदार दिव्या स्पंदना उर्फ रम्या यांनी ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या माजी खासदार दिव्या स्पंदना उर्फ रम्या यांनी ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे. भाजपाच्या नेत्या आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिव्या स्पंदना यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर लगेचच स्पंदना यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. यामुळेच स्पंदना सोशल मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर असलेले आधीचे सर्व ट्वीटही डिलीट करण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र दिव्या स्पंदना किंवा काँग्रेसने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून रम्या या राहुल गांधी यांच्या सोशल मीडियावरील खात्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. रम्या यांनी हा कारभार हाती घेतल्यापासून राहुल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारच्या कारभारावर अचूक व प्रभावी पद्धतीने निशाणा साधण्याचे प्रमाण वाढले होते. अनेकांकडून या बदलाचे स्वागतही करण्यात आले होते. मात्र याता स्पंदना यांचे ट्वीटर अकाऊंट बंद झाल्याने त्या काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
Divya Spandana tweets deleted, has she left Congress social media?
— ANI Digital (@ani_digital) June 1, 2019
Read @ANI story | https://t.co/ONmJLaMLcGpic.twitter.com/UqjmRbmr6y
काँग्रेसने काही दिवसांपूर्व आपल्या पक्ष प्रवक्त्यांना कोणत्याही वृत्तवाहिनीवर बाजू मांडण्यासाठी पाठवायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकांतील पराभव आणि त्यानंतर पक्षाध्यक्षपद सोडण्याचा राहुल गांधी यांनी घेतलेला निर्णय या पार्श्वभूमीवर चुकीच्या पद्धतीने बाजू मांडली जाऊ नये वा प्रवक्त्याच्या वक्तव्यातून गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे समजते. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजीवाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. तसेच देशातील वृत्तवाहिन्यांनी व संपादकांनी चर्चेच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये पक्ष प्रवक्ते वा प्रतिनिधींना बोलावू नये, अशी विनंतीही काँग्रेसने केली आहे. तूर्त एका महिन्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काही नेत्यांविषयी केलेली विधाने तशीच्या तशी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा, असे बोलले जाते.