नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या तीन कोटींच्या वर गेली असून साडे चार लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीकास्त्र सोडलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केंद्र सरकारने गंभीर चुका केल्याचा फटका देशाला सहन करावा लागल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी दैनिकात त्यांनी लिहिलेल्या "हम कैसे भूल जाएंगे वो दौर" या लेखामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
सोनिया गांधी यांनी 100 कोटी लसीकरण झाल्यानंतर संशोधक, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे. मात्र त्याचसोबत त्यांनी मोदी सरकारवर देखील जोरदार टीका केली. "मोदी सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दाखवलेल्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने अवलंबलेलं धोरण दु:खद आणि दुर्दैवी आहे. देशात जेव्हा कोरोनाची दुसरी लाट सर्वोच्च बिंदूवर होती, तेव्हा मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे सातत्याने लोकांचे जीव जात होते."
"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान नरेंद्र मोदी-अमित शहा झाले होते गायब"
"इतक्या वेळा इशारा देऊन देखील एखादं सरकार इतकं निष्क्रिय कसं राहू शकतं हे समजण्याच्या पलीकडचं आहे" असं सोनिया गांधी य़ांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. "आज आपण 100 कोटी लसीचे डोस देण्यात यशस्वी ठरलो आहोत, तर त्याचं श्रेय डॉक्टर, नर्स आणि लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आहे. लसीची व्यवस्था आणि वितरण करण्यात अयशस्वी ठरलेल्या सरकारमधील लोकांना त्याचं श्रेय जात नाही" असं देखील सोनिया यांनी नमूद केलं आहे. मोदी आणि शाहंवर देखील त्यांनी हल्लाबोल केला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गायब झाले होते असं म्हटलं आहे.
"पंतप्रधानांच्या वाढदिवशी 2 कोटींहून जास्त लसीकरण झालं, पण हे रोज का नाही होऊ शकत?"
"त्या भीषण काळात पंतप्रधान आणि गृहमंत्री गायब झाले होते, पण जशी कोरोनाची परिस्थिती सुधारली, ते पुन्हा समोर आले. पहिल्या लाटेदरम्यान अचानक लॉकडाऊनची घोषणा करून मजुरांना वाईट अवस्थेवर सोडून देण्यात आल्यासारखाच हा प्रकार आहे" अशा शब्दांत निशाणा साधला. "मोदी सरकार अजूनही कोरोनाविरोधातल्या लढ्याला इव्हेंट मॅनेजमेंटची संधी समजत आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी 2 कोटींहून जास्त लसीकरण झालं, पण हे रोज का होऊ शकत नाही? कारण वाढदिवसाच्या आधी लसींची साठेबाजी केली गेली" असं देखील सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.