नवी दिल्लीः कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून, लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्या कमी होत नाहीये. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच कोरोनाचं संक्रमण देशभरात वाढत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष मोदी सरकारला घेराव घालण्यासाठी एकत्र येत आहेत. देशाची सद्यस्थिती लक्षात घेता कॉंग्रेसने शुक्रवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता समविचारी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. कॉंग्रेसने बोलावलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला सपा आणि बसपाचा सहभाग होणार नाही, तसेच अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षसुद्धा यात सहभाग घेणार नसल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, द्रमुकचे नेते एम के स्टॅलिन आणि राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष आर. अजितसिंग आणि कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी या बैठकीत सामील होतील. या व्यतिरिक्त जनता दल (सेक्युलर)मधील एच डी देवेगौडा आणि फारुक अब्दुल्ला किंवा ओमर अब्दुल्ला सामील होऊ शकतात. आरजेडीच्या वतीने बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, आरएलएसपी अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री व हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी हे विरोधी पक्षांच्या बैठकीत भाग घेणार असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत बंगालमधील वादळानं नुकसान झालेल्या भागाचं हवाई सर्वेक्षण करणार आहेत. तर काही काळानंतर ममता बॅनर्जी या बैठकीला हजर राहतील, पण तोपर्यंत डेरेक ओ ब्रायन टीएमसीकडून सहभागी होणार आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जी आणि शिवसेना विरोधी पक्षांच्या बैठकीपासून अंतर ठेवत असल्याचं चित्र समोर आलं होतं, पण प्रथमच दोघे सामील होत आहेत. आम आदमी पार्टीमधील कोणीही या बैठकीत सहभागी होणार नाही. 'आप'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या सभेसाठी आमंत्रण मिळालेले नाही. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षानेही विरोधी पक्षाच्या बैठकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी ज्या पद्धतीने काम करतात, त्या नाराजीतून हे दोन मोठे पक्ष सामील होणार नसल्याची आता चर्चा आहे. कॉंग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीच्या मुख्य अजेंडामध्ये कोरोना विषाणूच्या साथीला सामोरे जाण्यासाठी सरकारने उचललेली पावले, स्थलांतरित मजुरांची दुर्दशा, त्यांचे प्रश्न आणि त्यांचे निराकरण करण्यात सरकारला आलेले अपयश, मोदी सरकारच्या २० लाख कोटींचा पॅकेजचाही समावेश असणार आहे. आर्थिक पॅकेजसारख्या सर्व मुद्द्यांवर संयुक्त रणनीतीवर चर्चा केली जाईल. कोरोना संकटानंतर विरोधी पक्षांची ही पहिली बैठक होणार आहे, जी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या बैठकीत कोरोना संकटाच्या बहाण्याने मोदी सरकारला घेराव घालण्यासाठी संयुक्त रणनीती आखली जाईल. डाव्यांसमवेत ममता बॅनर्जी यांच्या बैठकीत सामील होणे खूप महत्त्वाचे मानले जाते आणि या बैठकीत शिवसेनेचा सहभागही खूप महत्त्वाचा आहे.
हेही वाचा
घाबरू नका! पुन्हा येणाऱ्या कोरोना लाटेचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा
...म्हणून रशियातल्या 'त्या' नर्सनं पीपीईखाली फक्त अंतर्वस्त्रं घातली; कारण वाचून व्हाल अवाक्
पाकला चुना! चिनी कंपन्यांनी 60 अब्जांची गुंतवणूक करून कमावला 400 अब्ज रुपयांचा नफा
CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका