नवी दिल्ली: देशभरातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवावर दीर्घ चिंतन करण्यात आले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत अनेकविध विषयांवर मंथन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी गांधी कुटुंबीयांमुळे काँग्रेस कमकुवत होत असेल तर आम्ही त्याग करायला तयार आहोत, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांनी तूर्तास तरी अध्यक्ष न बदण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या सुमारे साडे चार तास चाललेल्या बैठकीत कार्यकारिणीच्या सदस्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. पक्ष मजबुतीसाठी नव्याने काम करण्याची गरज असल्याचे सदस्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. नवीन अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या दिशेने पक्ष तयारी करणार आहे.
पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी पक्षाचे चिंतन शिबिर
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी पक्षाचे चिंतन शिबिर आयोजित केले जाणार आहे. याच महिन्यात कार्यकारिणीच्या सदस्यांची आणखी एक बैठक होणार असून त्यात पुन्हा एकदा निवडणुकीतील पराभवाची चिकित्सा केली जाणार आहे. काँग्रेस आाणि भाजपदरम्यान विचारधारेचा लढा आहे. हा लढा जिंकण्यासाठी कठोर मेहनत आणि वेळ लागतो. तेव्हा हताश होण्याची गरज नाही, असे मत काँग्रेस कार्यकारिणीतील काही सदस्यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्याान, हरीश चौधरी आणि अजय माकन यांनी पंजाब निवडणुकीचा अहवाल सादर केला. देवेंद्र यादव आणि हरीश रावत यांनी उत्तराखंड, दिनेश गुंडू राव आणि पी. चिदम्बरम यांनी गोव्याचा, भक्त चरणदास आणि जयराम रमेश यांनी मणिपूरशी संबंधित आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि भूपेश बघेल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा अहवाल बैठकीत सादर केला. अंतर्गत गटबाजीसोबत निवडणुकीतील पराभवामागची कारणे यात नमूद केली आहेत.