Sonia Gandhi : "मी कधीच..."; राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चांवर सोनिया गांधींचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 12:42 PM2023-02-26T12:42:58+5:302023-02-26T12:54:47+5:30
Congress Sonia Gandhi : राजकारणातील निवृत्तीबाबत सोनिया गांधी यांनी मोठं विधान केलं आहे.
छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. यादरम्यान, त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. पक्षाध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करताना त्यांनी हे संकेत दिल्याची जोरदार चर्चा रंगली. मात्र आता राजकारणातील निवृत्तीबाबत सोनिया गांधी यांनी मोठं विधान केलं आहे.
सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. "मी कधीच निवृत्त झाली नव्हती आणि कधीच होणार नाही" असं म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ही माहिती दिली आहे. या मुद्द्यावर सोनिया गांधींशी चर्चा झाल्याचं अलका लांबा यांनी म्हटलं आहे. अलका यांनी "मी मॅडमना निवृत्तीशी संबंधित बातम्या मीडियामध्ये आल्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या की, मी कधीच निवृत्त झाली नाही आणि भविष्यातही होणार नाही" असं म्हटलं आहे.
"१९९८ साली मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. २५ वर्षात पक्षाने अनेक मोठे यश संपादन केले आहे आणि निराशाही आली आहे. २००४ आणि २००९ मध्ये आमच्या विजयाबरोबरच मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले, पण मला याचा सर्वाधिक आनंद आहे. अध्यक्ष म्हणून कार्यकाळात 'भारत जोडो यात्रे'ने संपुष्टात आली. यामुळे काँग्रेस आणि जनता यांच्यातील संवादाचा वारसा समृद्ध झाल्याचे" सोनिया गांधी म्हणाल्या.
'भारत जोडो यात्रे'साठी त्यांनी राहुल गांधींचे आभार मानले. काँग्रेस हा फक्त राजकीय पक्ष नसून देशाच्या एकात्मतेची धुरा आहे, असंही सोनिया गांधी म्हणाल्या. 'आम्ही देशाच्या प्रश्नांसाठी लढतो. आता आपण जनतेचा आवाज बनण्याची वेळ आली आहे. धर्म, जात, भाषेची पर्वा न करता आपल्या सर्वांचा आवाज बना. त्यामुळे आमचा विजय निश्चित होईल. राहुल यांच्या समर्पण आणि निष्ठेमुळे भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. त्याच्या यशाचे श्रेयही यात्रेत सहभागी असलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना जाते.सोनिया गांधी यांनीही आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला. 'दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. प्रत्येक संस्थेचा गैरवापर होत आहे. संविधानाच्या मूल्यांना धक्का पोहोचला आहे. पुढे आणखी कठीण काळ आहेत, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"