Bharat Jodo Yatra: गेल्या महिनाभरापासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. सध्या ही यात्रा कर्नाटकात असून, नोव्हेंबर महिन्यात ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. सोनिया गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याने काँग्रेसमध्ये पुन्हा चैतन्य भरून नवसंजीवनी मिळणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एकीकडे, राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू आहे. राजस्थानमध्येही नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांना उमेदवारी दिल्याने पक्षात दोन गट पडल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात असल्याचे बोलले जात आहे. यातच आता आपल्या चार दिवसीय कर्नाटक दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
सोनिया गांधी पदयात्रेत घेणार सहभाग
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मंड्या जिल्ह्यातील जक्कनहल्ली येथून पदयात्रेत सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत काही अंतर पायी चालणार असल्याचे बोलले जात आहे. सोनिया गांधी यांचा भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन काहीच अंतर चालण्याचा कार्यक्रम असला तरी त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आपल्या अध्यक्षांनी भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन पदयात्रा काढल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य संचारले असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरू केली, तेव्हा सोनिया गांधी देशात नव्हत्या. भारत जोडो यात्रेच्या प्रारंभी सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात गेल्या होत्या. भारतात परतल्यानंतर आता सोनिया गांधी प्रथमच राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"